कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच राजकीय आरोप प्रत्यारोपांना जोर वाढू लागला आहे. जनता दलाचे (सेक्युलर) नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच प्रल्हाद जोशी यांना मुख्यमंत्री बनविण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून योजना आखली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. “कुमारस्वामी म्हणाले की, प्रल्हाद जोशी यांना पुढील मुख्यमंत्री बनविण्याचा घाट घातला जात आहे. जोशी हे संस्कृतीहीन ब्राह्मण समाजातून येतात. त्यांना दक्षिण भारताच्या संस्कृतीचा गंध नाही”, अशी टीका कुमारस्वामी यांनी केली.
कुमारस्वामी यांचे हे वक्तव्य प्रल्हाद जोशी यांनी गौडा कुटुंबावर केलेल्या टीकेनंतर आले आहे. शनिवारी (दि. ४ फेब्रुवारी) भाजपाच्या विशेष कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना जोशी यांनी एचडी कुमारस्वामी यांच्या प्रस्तावित पंचरत्न यात्रेवर टीका केली होती. जोशी म्हणाले, “कुमारस्वामी यांचे वडील भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या कुटुंबातील निवडून येणाऱ्या लोकांचा विचार करता या यात्रेचे नाव पंचरत्न न ठेवता नवग्रह यात्रा ठेवायला हवे. देवेगौडा, त्यांची दोन मुले, त्यांच्या पत्नी, त्यांचीही दोन मुले असे कुटुंबात एकूण नऊ सदस्य आहेत. त्यामुळे या यात्रेचे नाव नवग्रह यात्रा ठेवायला हवे.”
तसेच हसन विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुनही जोशी यांनी गौडा परिवारावर टीका केली होती. या विधानसभेच्या जागेवरुन गौडा कुटुंबात वाद आहेत. त्यावर ते म्हणाले की, गौडा कुटुंबाच्यावतीने सांगण्यात येत आहे की, पक्षश्रेष्ठी या जागेबाबत ठरवतील. पक्षश्रेष्ठी? हे कुटुंबच पक्षश्रेष्ठी आहे. मग हा वाद, हे नाटक कशासाठी चाललंय? असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला होता.
जोशी यांच्या टीकेनंतर कुमारस्वामी यांनी देखील त्यांच्यावर आरोप करण्याची संधी सोडली नाही. रविवारी एका सभेत बोलत असताना ते म्हणाले, “निवडणुका संपल्यानंतर प्रल्हाद जोशींना मुख्यंमत्री बनविण्याचा आरएसएसचा डाव आहे. ते दक्षिण भारतातील ब्राह्मण संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत नाहीत. ब्राह्मण समाजाचे दोन ते तीन प्रकार आहेत. जोशी हे पेशवे समाजातून येतात ज्यांनी श्रृंगेरी मठाची नासधूस केली होती आणि महात्मा गांधी यांची हत्या केली होती. ते कर्नाटकातील जुन्या ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी नाहीत. आरएसएसने त्यांना मुख्यमंत्री बनविण्याचे ठरविले असल्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत.”
हे देखील वाचा >> “मी नखाला नख घासलं, पण माझे केस…”, अजित पवारांनी रामदेव बाबांचा किस्सा सांगताच सभेत हशा पिकला
“या समाजाला कट कारस्थान करुन फक्त देशाचे विभाजन करायचे आहे. मी वीरशैव (लिंगायत), वोक्कलिगा, इतर मागास जाती (ओबीसी) आणि दलित समाजाला विनंती करतो की, त्यांनी भाजपा आणि आरएसएसच्या कुटील डावपेचांना बळी पडू नये. प्रल्हाद जोशी यांना मुख्यमंत्री करुन संघ कर्नाटक राज्याचे विभाजन करेल. जोशी यांच्या सरकारमध्ये आठ उपमुख्यमंत्री असतील”, असेही कुमारस्वामी म्हणाले आहेत.