छत्रपती संभाजीनगर : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून अर्चना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत याचे पुतणे धनंजय सावंत चिडले. त्यांनी समर्थकांसह मुंबई गाठली. या सर्व प्रकरणात अद्याप मंत्री सावंत यांनी मौनच बाळगले आहे. त्यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही आणि ते अद्याप महायुतीच्या प्रचारासाठी आयोजित एकाही बैठकीस गैरहजरच असल्याचे सांगण्यात येत आहे. सावंत यांचे मौन परंडा मतदारसंघात परिणाम करणारे असू शकेल असे सांगण्यात येत आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी बदलून देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या तानाजी सावंत समर्थकांनी सदस्यता नोंदणी अर्जाची होळी केली. समर्थकांसह अनेक गाड्या मुंबईकडे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, या प्रकरणी तानाजी सावंत यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एरवी अनेक विषयांवर बोलणारे तानाजी सावंत शांत असल्यामुळे सुरू असणाऱ्या दबाव वाढविण्याच्या राजकारणाला त्याची मूक संमती असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाही या मतदारसंघावर शिवसेनेचा अधिकार असल्याचा दावा सावंत गटाकडून केला जात आहे. शिवसेनेच्या या जागेवर राष्ट्रवादीला उमेदवारी देण्याचा हा निर्णय कार्यकर्त्यांच्या दृष्टीने चुकीचा आहे. त्यामुळे होणाऱ्या आंदोलनाची माहिती मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आली असल्याचे सावंत गटाच्या वतीने सांगण्यात आले.
हेही वाचा – “यंदा मोदी लाट नाही, आमचा विजय निश्चित”, काँग्रेसच्या उमेदवाराचा दावा
तानाजी सावंत यांच्या फटकळ स्वभावामुळे अनेकजण दुखावले जातात. राग आल्यावर ते कोणावरही डाफरतात. मात्र, या वेळी उमेदवारीबाबत त्यांचा शब्द डावलून राष्ट्रवादीला जागा सुटल्यानंतर पुतणे सावंत यांच्या पाठिशी ते उभे राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकतेच बार्शी येथे अर्चना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे धनंजय सावंत यांच्या उमेदवारी बदलाच्या मागणीला बळ मिळत असल्याचेही सांगण्यात येत आहे.