झारखंडच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहे. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) आमदार सरफराज अहमद यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे झारखंडच्या विधानसभा सचिवालयाने हा राजीनामा स्वीकारलेला आहे. अहमद हे गांडेय मतदारसंघाचे आमदार होते. झारखंडचे मुख्यमंत्री तथा जेएमएम पक्षाचे सर्वेसर्वा हेमंत सोरेन यांना ईडीची नोटीस आलेली आहे. एकीकडे ही नोटीस आलेली असताना दुसरीकडे अहमद यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे, ज्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमद यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला उधाण

अहमद यांनी राजीनामा का दिला, हे स्पष्टपणे समजू शकलेले नाही. इंडियन एक्स्प्रसने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. जेएमएमच्या प्रवक्त्या सुप्रिया भट्टाचार्य यांनीदेखील या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. पीटीआयशी बोलताना मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे, असे अहमद यांनी सांगितले आहे.

“मी त्यांचा राजीनामा स्वीकारला”

झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रबिंद्रनाथ महातो यांच्याशी इंडियन एक्स्प्रेसने संपर्क साधून अहमद यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. “मी अहमद यांना त्यांच्या राजीनाम्याचे कारण विचारलेले नाही, कारण राजकीय दृष्टीने ते चतूर आहेत. त्यांनी आपल्या आमदारकीचा रविवारी राजीनामा दिलेला आहे. मी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे,” असे महातो म्हणाले.

अहमद तीन वेळा आमदार

अहमद हे गांडेय या मतदारसंघाचे एकूण तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. १९८० साली झारखंड हे राज्य बिहार राज्याचाच भाग होते. तेव्हा ते या मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. झारखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतर २००९ सालच्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरच या मतदारसंघातून विजय मिळवला होता. पुढे अहमद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत जेएमएममध्ये प्रवेश केला. २०१९ सालच्या निवडणुकीत त्यांनी जेएमएमच्या तिकिटावर गांडेय मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी १९८४ सालची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीतही त्यांनी गिरीडीह मतदारसंघातून विजय मिळवला होता.

सोरेन यांना ईडीची नोटीस

हेमंत सोरेन यांना सातव्यांदा ईडीची नोटीस आली आहे. कथित जमीन घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली चौकशी करण्यासाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे, असे सोरेन यांना नोटिशीच्या माध्यमातून कळवण्यात आले आहे. या नोटिशीच्या एका दिवसानंतर अहमद यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

सोरेन यांची पत्नी होणार मुख्यमंत्री? भाजपाचा दावा

अहमद यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाने सोरेन यांच्यावर टीका केली आहे. सोरेन यांना ईडीची नोटीस आलेली आहे, त्यामुळे या चौकशीदरम्यान काहीही होऊ शकते. अशा परिस्थितीत सोरेन यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यावर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना गांडेय या मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवता यावी आणि मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच राहावे, यासाठी अहमद यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे, असा आरोप भाजपाने केला आहे.

“ईडीने सोरेन यांच्यावर कारवाई केल्यास…”

जेएमएम पक्षातील सूत्रांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “ईडीने सोरेन यांच्यावर कारवाई केल्यास तसेच त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायऊतार व्हावे लागल्यास गांडेय या मतदारसंघातून आमदार नसलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकेल आणि मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळू शकेल, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असावा. दरम्यान, या फक्त चर्चा आहेत. २०२२ मध्येही सोरेन यांनी अशीच तयारी केली होती,” असे जेएमएमच्या सूत्रांनी सांगितले.

झारखंड विधानसभेत कोणाचे किती आमदार?

दरम्यान, झारखंडच्या विधानसभेत जेएमएम, काँग्रेस आणि राजद यांची युती सत्तेत आहे. जेएमएम पक्षाचे एकूण २९, काँग्रेसचे १७; तर राजदचा एक आमदार आहे. भाजपाचे एकूण २६, तर एजेएसयू पक्षाचे तीन आमदार असून या दोन्ही पक्षांची युती आहे. आगामी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात या राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemant soren ed notice regarding land scam jmm mla sarfaraz ahmad resign as mla prd