मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नवनियुक्त खासदार नरेश म्हस्के यांच्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकाला उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयानेही विचारे यांच्या याचिकेची दखल घेऊन म्हस्के यांच्यासह २२ उमेदवारांना गुरुवारी समन्स बजावले व विचारे यांच्या आरोपांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
म्हस्के यांची ठाणे मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी आणि आपली या मतदारसंघाचे खासदार म्हणून निवड जाहीर करावी, अशी मागणी विचारे यांनी केली आहे. न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठासमोर विचारे यांची याचिका गुरुवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी न्यायालयाने म्हस्के यांच्यासह अन्य २२ उमेदवारांना समन्स बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा…कारण राजकारण: काँग्रेसच्या निसटत्या आघाडीने दानवेपुत्रास चिंता
तत्पूर्वी, म्हस्के यांच्या उमेदवारी अर्जात त्यांना कधीही दोषी ठरवलेले नाही, असा दावा केला होता. प्रत्यक्षात दंगलीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. तसेच ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचे अपीलही फेटाळले होते, असे विचारे यांच्या वतीने वरिष्ठ वकील दरायस खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले. आपल्यावर गुन्हेगारी खटले दाखल आहेत की नाहीत हे मतदारांना कळावे यासाठी उमेदवाराने उमेदवारी अर्जात त्याचा खुलासा करणे अनिवार्य आहे. परंतु म्हस्के यांनी गुन्हेगारी खटल्याची माहिती लपवली, असा दावा खंबाटा यांनी केला.