हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील संजौली भागातील एका मशिदीवरून मोठा वाद चालू आहे. हिमाचल प्रदेश विधीमंडळ अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षांच्या आमदारांनी या अवैध इमारतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पंचायत राज व ग्रामविकास मंत्री अनिरुद्ध सिंह यांनी यावर उत्तर दिलं. त्यानंतर सत्ताधारी काँग्रेसने नव्हे तर विरोधी बाकावरील भाजपा आमदारांनी बाकं वाजवून त्यांना समर्थन दिलं, तसेच त्यांचं कौतुकही केलं. विधानसभा असो किंवा संसद, सभागृहांमध्ये असं चित्र हल्ली पाहायला मिळत नाही. मात्र हिमाचल प्रदेश विधानसभेत हा क्षण सर्वांना पाहायला मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदुत्ववादी संघटनांनी या मशिदीला विरोध केला आहे. तर भाजपाने हा मुद्दा उचलून धरला आहे. अशातच काँग्रेसच्या मंत्र्याने या मागणीचं सभागृहात समर्थन केल्याने भाजपा आमदारांनी देखील त्यांचं कौतुक केलं. भाजपाने बेकायदेशीर इमारत पाडण्याची मागणी केलेली असताना अनिरुद्ध सिंह यांनी एक पाऊल पुढे जाऊन राज्यात आलेल्या परप्रांतींयांची नोंदणी करण्याचा मुद्दा देखील उपस्थित केला. मुळात हा भाजपाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सिंह यांनी त्याच मुद्द्याला हात घातल्यानंतर भाजपाकडून त्यांना समर्थन मिळणं स्वाभाविक होतं. भाजपा आमदार बलबीर शर्मा यांनी अधिवेशनात ४ सप्टेंबर रोजी संजौली येथील मशिदीचा मुद्दा उपस्थित केला होता.

“ती मशीद अनेक दशकं जुनी”, स्थानिक आमदाराचा दावा

ही मशीद शिमला (शहर) विधानसभा मतदारसंघात आहे. येथील स्थानिक आमदार हरीश जनार्थ यांनी मात्र सभागृहात वेगळी भूमिका मांडली. मशिदीवरील कारवाईस त्यांनी विरोध दर्शवला तसेच ते म्हणाले या मशिदीला बेकायदेशीर म्हणणं चुकीचं ठरेल. ही मशीद अनेक दशकांपूर्वी बांधण्यात आली आहे. १९५० च्या आधीच ही मशीद बांधण्यात आली होती. या मुद्द्यावर परिसरात कोणत्याही प्रकरचा तणाव नाही. दोन दिवसांपूर्वी तिथे निदर्शने झाली, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. कोणीही या मुद्द्यावर राजकारण करू नये.

राज्यात रोहिंग्या मुस्लिम घुसखोरी करतायत; मंत्री अनिरुद्ध सिंह

दरम्यान, अनिरुद्ध सिंह यांनी या मुद्द्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले, “नाहान, चंबा, पाओंटा साहिब आणि कासुम्प्टी भागात एका समाजातील लोक मोठ्या प्रमाणात राहतात. यापूर्वी राज्यात कुठेही अशी घटना घडलेली नाही. मात्र आत्ताच असं का घडतंय? याचं कारण शोधायला हवं. अलीकडच्या काळात राज्यात नवे लोक राहायला आले आहेत. ‘जमात’वाले लोक राज्यात येतायत, ज्यांचा कोणतही ठावठिकाणा नाही असेही लोक हिमाचलमध्ये येतातय. हे रोहिंग्या मुस्लिम आहेत का? माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं. या लोकांची चौकशी व्हावी. यात काही बांगलादेशी लोक असू शकतात.

विरोधी पक्षनेत्याचं समर्थन

दरम्यान, विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी देखील अनिरुद्ध सिंह यांचा मुद्दा लावून धरला. ते म्हणाले, आम्ही कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या विरोधात नाही. आम्ही केवळ बेकायदेशीर बांधकामांबद्दल बोलत आहोत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू सभागृहाला संबोधित करताना म्हणाले, कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले, कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करायला हवी. विक्रमादित्य व सुखविंदर यांच्यात मतभेद आहेत. त्यांनी देखील यावेळी अनिरुद्ध सिंह यांचा मुद्दा लावून धरला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Himachal pradesh assembly bjp mla cheered for congress minister shimla masjid case asc