हिमाचल प्रदेश भाजपाला मोठा धक्का बसला आहे. २००९ ते २०१२ या काळात हिमाचल प्रदेशात भाजपचे नेतृत्व करणारे प्रेमकुमार धुमल यांचे निकटवर्तीय खिमी राम यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी मंगळवारी अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला.. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीत कुल्लू जिल्ह्यातील बंजार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा त्यांचा विचार केला आहे. याच मतदार संघातून ते दोन वेळा निवडून आले होते.

काँग्रेस प्रवेशाबाबत खिमी राम यांनी सांगितले की ” माझ्या मनात भाजपाबद्दल कुठलाही राग नाही. कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत कोणीही माझ्यावर दबाव टाकला नाही. देशात अनेकवेळा काँग्रेसने सरकार स्थापन केले आहे. काँग्रेसच्या काळात देशाचा प्रचंड विकास झाला आहे. सध्याच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि इतर अनेक समस्या आहेत. पक्ष पुढे जाईल आणि मला आशा आहे की राहुल गांधी पंतप्रधान होतील”  प्रदेशचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे प्रभारी राजीव शुक्ला यांच्या उपस्थितीत रामा यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

कुल्लू येथील ७३ वर्षीय खिमी राम यांनी १९९० च्या दशकात राजकारणात प्रवेश केला होता. २००३ मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर बंजारमधून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. चार वर्षांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी ही जागा राखली. त्याच वर्षी राम यांची विधानसभेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात आली.

विद्यमान मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर धुमल यांच्या पाठिंब्याने ते २००९ मध्ये ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. पुढच्या वर्षी राम यांची या पदावर एकमताने पुन्हा निवड झाली. परंतु त्यांचा कार्यकाळ हा कायम वादग्रस्तच ठरला आहे. नवीन धीमान आणि टिक्कू ठाकूर यांना भाजपाच्या राज्य मंडळातून आणि जिल्हा युनिटमधून काढून टाकण्याच्या खिमी रामच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता.

भाजपाने संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. जे.पी नड्डा आणि माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या सल्ल्यानुसार तत्कालीन भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राम यांना प्रदेश भाजप अध्यक्षपदावरून हटवले  आणि त्यांना कॅबिनेट पद (वनमंत्री) देण्यात आले.

Story img Loader