कथित बनावट आयुष्मान भारत कार्ड प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ईडीच्या रडारवर असलेले हिमाचल प्रदेशचे दोन नेते मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांच्या जवळचे मानले जातात. नगरोटा बागवानचे आमदार रघुबीर सिंह बाली किंवा आर. एस. बाली यांच्याकडे सुखू सरकारमधील कॅबिनेट दर्जाचे पद आहे. ते हिमाचलचे माजी मंत्री जी. एस. बाली यांचे पुत्र आहेत; तर राजेश शर्मा हे प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार, कथित आयुष्मान भारत योजनेच्या फसवणूक प्रकरणातील चौकशीचा भाग म्हणून ईडीने बुधवारी हिमाचल प्रदेशमधील सिमला, कांगडा, उना, मंडी व कुल्लू जिल्ह्यांतील, तसेच दिल्ली, चंदिगड व पंजाबमधील सुमारे १९ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. आर. एस. बाली यांची कंपनी हिमाचल हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडद्वारे कांगडा येथील फोर्टिस रुग्णालय आणि राजेश शर्मा यांच्याद्वारे प्रमोट करण्यात आलेले कांगडा येथील बालाजी रुग्णालय या रुग्णालयांवर छापे टाकण्यात आले आहेत.
हेही वाचा : मुस्लीम कट्टरपंथी ते कावड सेवक; उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रमुख चेहरा, कोण आहेत इम्रान मसूद?
कोण आहेत आर. एस. बाली?
आर. एस. बाली यांनी २०२२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नगरोटा बागवान जागा जिंकली. हा एकेकाळी त्यांच्या दिवंगत वडिलांचा बालेकिल्ला होता; ज्यांनी या मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या मालमत्तेमुळे त्यांचे नाव निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या तीन श्रीमंत उमेदवारांमध्ये आले. ते मुख्यमंत्री सुखू यांचे निकटवर्तीय असल्यामुळे आर. एस. बाली यांना हिमाचल प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष व हिमाचल प्रदेश पर्यटन विकास मंडळाचे उपाध्यक्षपद मिळाल्याचे मानले जाते.
एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले की, आर. एस. बाली यांचे वडील त्यांच्या विपरीत होते. दिवंगत जी. एस. बाली यांचे नेते म्हणून स्वतःचे अस्तित्व होते. काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते व हिमाचलचे सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले वीरभद्र सिंह यांच्याशी त्यांचे बरेच मतभेद होते. छाप्यांनंतर लगेचच आर. एस. बाली यांना फेसबुकवर लिहिले, “माझा मुलगा रियानला सुट्या असल्याने मी २९ जुलै रोजी माझ्या कुटुंबासह दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेलो होतो आणि मला आताच कळले की काही अधिकारी माझ्या निवासस्थानी आले आहेत. मी माझ्या कुटुंबासह परतत आहे. आम्ही तपास यंत्रणांचा आदर करतो आणि त्यांना पूर्ण सहकार्य करू. मी माझ्या नगरोटा बागवान कुटुंबाला आणि राज्यातील आमच्याशी जुळलेल्या सर्वांना विनंती करतो की, काळजी करू नका. जेव्हा तुम्ही राजकीय जीवन जगता तेव्हा तुम्हाला कधी कधी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते.”
योगायोगाने लोकसभा निवडणुकीपूर्वी आर. एस. बाली यांचे नाव कांगडा लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आले होते. त्यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रथम त्यांच्या मतदारसंघातील लोकांचे मत जाणून घेण्याचे आवाहन केले होते. अखेर माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांना काँग्रेसने कांगडामधून उमेदवारी देण्यात आली होती; मात्र त्यांचा पराभव झाला.
हेही वाचा : अरविंद केजरीवलांनंतर ‘आप’च्या आणखी एका नेत्याला होणार अटक? कोण आहेत दुर्गेश पाठक?
कोण आहेत राजेश शर्मा?
राजेश शर्मा यांनी २०२२ ची विधानसभा निवडणूक लढवली होती; मात्र त्यांचा पराभव झाला होता. नुकताच त्यांचा मुख्यमंत्री सुखू यांच्याशी पोटनिवडणुकीच्या जागेवरून वाद झाला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केला होता की, पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येऊ नये म्हणून त्यांना शिमला येथील त्यांच्या निवासस्थानी कोंडून ठेवण्यात आले होते. ही जागा सुखू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी लढवली आणि जिंकली. मात्र, या वादविवादानंतर शर्मा यांना ठाकूर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी तयार करण्यात आले. त्यांनी ठाकूर यांचा प्रचारही केला. ठाकूर यांनी त्यांना ‘भाऊ’, असे संबोधून तिकिटावरील नाराजीबद्दलचे प्रश्न दूर केले. देहराबरोबरच काँग्रेसने पोटनिवडणुकीत नालागढ जागाही जिंकली होती; ज्यामुळे सुखू सरकार पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना अपयश आले.