Himachal Pradesh Election 2022 : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर येथे प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज (६ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शिमला येथे भाजपाचा जाहीरनामा सार्वजनिक केला. यावेळी भाजपाने समान नागरी कायदा लागू करण्यासोबतच नोकरी, करकपात, स्टार्टअप्सबाबातचे आश्वासन दिले आहे.
भाजपाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनं
भाजपाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांबाबत जेपी नड्डा यांनी अधिक माहिती दिली आहे. आमचे सरकार सत्तेत आले, तर आम्ही समान नागरी कायदा लागू करू. त्यासाठी एका समितीची स्थापना केली जाईल. समितीने दिलेल्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात येईल, असे नड्डा यांनी सांगितले. तसेच आगामी काळात राज्यात ८ लाख नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. यामध्ये सरकारी नोकऱ्यांचाही समावेश असेल. हिमाचल प्रदेशमधील सर्व गावांमध्ये पक्के रस्ते बसवले जातील. सीएम अण्णा दत्ता योजना ९ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही नड्डा यांनी सांगितले.
भाजपा सत्तेत आल्यास आम्ही ‘शक्ती’ नावाची मोहीम राबवू. यामध्ये पायाभूत सुविधा तसेच वाहतूक सुकर करण्याचाा प्रयत्न केला जाईल. तसेच धार्मिक स्थळे, मंदिरांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्के रस्ते बांधले जातील. छोटे उद्योग आणि स्थानिक बाजारपेठांना चालना देण्यासाठी सफरचंद पॅकेजिंगवर १२ टक्के कर आकारला जाईल. उर्वरित कर केंद्र सरकार भरेल, असेही आश्वासन नड्डा यांनी दिले.
आगामी काळात ५ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना केली जाईल. तसेच मोबाईल क्लिनिकसाठी वापरण्यात येणाऱ्या व्हॅनची संख्या दुप्पट केली जाईल. स्टार्टअप्स उभे करण्यासाठी ९०० कोटींची तरतूद केली जाईल. सैनिकांसाठीचे अनुदान तसेच शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल. वक्फ बोर्डाचे सर्वेक्षण केले जाईल. तसेच मालमत्तांचा कोठे बेकायदेशीर वापर होत आहे का, हे तपासले जाईल, असेही नड्डा यांनी सांगितले.
हेही वाचा >>> निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का! तीन दशकांपासून सक्रिय असलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा
महिला व बालविकासासाठीही आमच्याकडून प्रयत्न केले जातील, असे नड्डा यांनी सांगितले. गरिब महिलांना ३ सिलिंगर गॅस सिलिंडर मोफत दिले जातील. गरिब कुटुंबाचा अटल पेन्शन योजनेत समावेश केला जाईल. ५००० मुली तसेच टॉपर्सना दरमहा २५०० रुपये स्कॉलरशीप दिली जाईल, असेही नड्डा यांनी सांगितले.