विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमधील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा तसेच काँग्रेसकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत आप अर्थात आम आदमी पक्षानेदेखील उडी घेतल्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंजक ठरत आहे. दरम्यान, सध्या येथे भाजपाची सत्ता असल्यामुळे रस्ते, शिक्षण, आरोग्य तसेच इतर पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावरून मतदारांमध्ये नाजारी असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाच्या उमेदवारांना सत्ताविरोधी लाटेला (anti-incumbency) सामोरे जावे लागत आहे. येथील चुराह मतदारसंघातही अशीच स्थिती आहे.
हेही वाचा >> Himachal Pradesh Election: “उमेदवार बघू नका, कमळाला मत म्हणजेच मला मत” हिमाचल प्रदेशातील सभेत पंतप्रधान मोदींचं विधान
चंबा जिल्ह्यातील चुराह ही जागा भाजपाने मागील दोन निवडणुकांत सलग जिंकली आहे. सध्या २०२२ च्या निवडणुकीसाठी भाजपाकडून विद्यामान आमदारर हंस राज (३९) यांना उमेदारी देण्यात आली आहे. हंस राज यांनी २०१२ आणि २०१७ साली झालेल्या निवडणुकांत याच जागेवरून विजय मिळवलेला आहे. तर दुसरीकडे या जागेवर काँग्रेसकडून यशवंत सिंग खान्ना यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. खन्ना पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून ते याआधी एका सरकारी शाळेत शिक्षक म्हणून नोकरीवर होते. उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा >> Himachal Pradesh Election: मतं मागण्यासाठी उमेदवारांकडून इंदिरा गांधी आणि वाजपेयींच्या नावाचा वापर
मागील १० वर्षांपासून ही जागा भाजपाच्या ताब्यात आहे. मात्र विकासाच्या मुद्द्यावरून येथे मतदारांमध्ये नाराजी आहे. हंस राज यांना सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतोय. तिसा येथील शासकीय महाविद्यालयातील भाटिया नावाच्या विद्यार्थ्याचीही तीच भावना आहे. “आमच्या कॉलेजमध्ये शिक्षक नाहीयेत. जे तास होतात त्यामध्ये सध्याचे शिक्षक फक्त सोपस्कार म्हणून शिकवतात. आमच्या महाविद्यालयात प्राध्यापकांची नियुक्ती करावी, अशी आमदारांना अनेकवेळा विनंती करण्यात आलेली आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी तर शिक्षकच नाहीयेत. रुग्णालयांचीही तीच स्थिती आहे. शासकीय रुग्णालयात साधे एक्स-रे मशीन नाहीये,” अशी खंत या विद्यार्थ्याने बोलून दाखवली.
हेही वाचा >> ‘अब्दुल सत्तार जोकर, त्यांना तमाशात पाठवा,’ सुप्रिया सुळेंवरील टिप्पणीनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची टीका
अश्रफ अली यांचीदेखील अशीच भावना आहे. “स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आज असते तर त्यांनी येथील स्थानिक समस्यांवर लक्ष दिलं असतं. येथे काँग्रेस आणि भाजपा अशा दोघांनीही समज विभाजनाचे काम केले. समाजाचे विभाजन करून त्यांनी त्यांचा फायदा करून घेतला. मात्र येथील लोक हुशार आहेत. सध्या शासकीय रुग्णालयांत एक्स-रे मशीन नाहीये. तसेच इतर उपकरणांचीही वाणवा आहे. छोट्या छोट्या आजारावर उपचार घेण्यासाठी तिसा येथील नागरिकांना छंबा आणि तंडा येते जावे लागते,” असे अश्रफ अली यांनी सांगितले.
हेही वाचा >> सुप्रिया सुळेंवरील अभद्र टिप्पणीनंतर किशोरी पेडणेकर आक्रमक, सत्तार यांंचा उल्लेख करत म्हणाल्या “दोन थोबाडीत…”
दरम्यान, चुराह ही जागा मागील १० वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. मात्र या काळात म्हणावा तसा विकास झालेला नाही, अशी भावना येथील मतदरांमध्ये आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपाला जास्त ताकद लावावी लागणार आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.