हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा हिमाचल प्रदेशात आठ सभा आणि रोड शो करणार आहेत. १० नोव्हेंरपर्यंत मंडी, कुल्लू, कांगरा, चंबा हमीरपूर, उना, शिमला आणि सिरमौरमध्ये त्या काँग्रेसचा प्रचार करणार आहेत.

हेही वाचा- हिमाचल प्रदेशवर पाणी सोडत ‘आप’ने लक्ष केंद्रीत केले गुजरातवर

३ नोव्हेंबरला कांगरा आणि चंबामधील सभेच्याआधी प्रियांका गांधी ३१ ऑक्टोबरला मंडी आणि कुल्लूला भेट देणार आहेत. १० नोव्हेंबरला गांधी शिमला आणि सिरमौरमध्ये सभा घेणार आहेत. हिमाचल प्रदेशात सत्तेत परतण्यासाठी काँग्रेसकडून अथक प्रयत्न केले जात आहेत. या राज्यात १२ नोव्हेंबरला मतदान तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. हिमाचल प्रदेशात सध्या भाजपाची सत्ता असून या निवडणुकीत काँग्रेसकडून मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

हेही वाचा- हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे ‘मिशन रिपीट’ यशस्वी होणार?

१४ ऑक्टोबरला सभेला संबोधित करत प्रियांका गांधी यांनी हिमाचल प्रदेशात निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. हिमाचल प्रदेशात १ लाख रोजगार देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. सत्ताधारी भाजपाने कर्मचारी, तरुण आणि महिलांसाठी काहीही केलं नसल्याचं टीकास्र प्रियांका गांधींनी भाजपा सरकारवर डागलं आहे. काँग्रेसने आत्तापर्यंत ६८ पैकी ६३ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. तर भाजपाने ६२ उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवडणूक प्रचारसभा हिमाचल प्रदेशात आत्तापर्यंत झाल्या आहेत.

Story img Loader