गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांनी त्यांच्या मूळ पक्षांमधून भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे इतर पक्षांतून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांवर पटकन विश्वास न ठेवण्यासाठी ओळखले जातात. भाजपामध्ये नव्याने आलेल्या दिगग्ज नेत्यांपैकी अनेक नेते हे अजूनही जबादारी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु २०१५ मध्ये काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश करणारे हिमंता बिस्वा सरमा मात्र याला अपवाद आहेत. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काही महिन्यांतच हिमंता बिस्वा सरमा यांनी शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघांचाही विश्वास संपादन केला होता. आसामचे मुख्यमंत्री सरमा हे आता भाजपचे गो-टू मॅन आहेत.
ईशान्य भारत ते महाराष्ट्र पक्षाने प्रत्येक वेळी अशक्य वाटणारी संख्या गोळा करण्यासाठी किंवा प्रतिस्पर्धी पक्षांद्वारे चालवलेल्या आणि फसलेल्या सरकारांना धक्का देण्यासाठी सरमा यांची मदत घेतली जाते. सध्या ते ताज्या राजकीय घटनांच्या केंद्रस्थानी आहेत. झारखंडमधील जेएमएम-काँग्रेस-आरजेडी युती पश्चिम बंगालच्या हावडा येथे काँग्रेसच्या तीन आमदारांना मोठ्या प्रमाणात रोख रकमेसह अटक करण्यात आल्यानंतर, काँग्रेस आमदार कुमार जयमंगल सिंग यांनी राज्य सरकार पाडण्याच्या भाजपच्या कथित प्रयत्नांमध्ये सरमा यांची प्रमुख भूमिका असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. सरमा यांनी आरोप फेटाळून लावले, ते म्हणाले की “ते अनेक काँग्रेस नेत्यांच्या नियमित संपर्कात आहेत ज्यांना त्यांनी “जुने मित्र” म्हणून संबोधले आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सरमा म्हणाले, “ही एफआयआर खोटी आणि निराधार आहे. कारण गेल्या आठवड्यात जयमंगल सिंग यांची दिल्लीत भेट झाल्याचे पुरावे रेकॉर्डवर आहेत. माझी काँग्रेस पक्षाला विनंती आहे की त्यांनी राज्य पोलिसांचा अशा प्रकारे गैरवापर करू नये.
महाराष्ट्रातील ऑपरेशनमध्ये, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बंडखोरांना २२ जून रोजी सुरतहून गुवाहाटी येथे नेण्यात आले तेव्हा सरमा यांनी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली होती. भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, सरमा हे त्यावेळी अभूतपूर्व पूरपरिस्थितीला तोंड देण्याचे काम करत होते.