आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांच्यात तणाव पाहायला मिळत आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी गोगोई यांना काही प्रश्न केले. हिमंता बिस्वा म्हणाले, ते सलग १५ दिवस पाकिस्तानात राहिले आहेत का आणि त्यांच्या पत्नीला पाकिस्तानच्या स्वयंसेवी संस्थेकडून पगार मिळतो का? आसामच्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ कोलबर्न गोगोई यांना पाकिस्तानस्थित एका स्वयंसेवी संस्थेकडून पगार मिळतो आणि त्या व त्यांची मुले भारतीय नागरिक नाहीत असा आरोप केला होता. सोशल मीडियावर गोगोई यांचे नाव न घेता त्यांना प्रश्न विचारणारी पोस्ट हिमंता बिस्वा यांनी केली. त्यांनी गोगोई यांची पत्नी आणि त्यांच्या मुलांच्या नागरिकत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नेमका हा वाद काय? हिंमता बिस्वा यांनी गोगोई व त्यांच्या कुटुंबावर काय आरोप केले? जाणून घेऊ.

नेमका वाद काय?

एकीकडे पहलगाममधील हल्ल्यानंतर देशभरात संताप उसळला आहे. याचदरम्यान एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले, “काँग्रेस पक्षाच्या माननीय खासदारांना प्रश्न, तुम्ही सलग १५ दिवस पाकिस्तानला भेट दिली का? जर दिली असेल तर तुमच्या भेटीचा उद्देश स्पष्ट करू शकता का? तुमच्या पत्नीला भारतात राहून आणि काम करत असूनही पाकिस्तानस्थित स्वयंसेवी संस्थेकडून पगार मिळत आहे हे खरे आहे का? जर असेल तर पाकिस्तानस्थित संघटना भारतात चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी पगार का देत आहेत? तुमच्या पत्नी आणि तुमच्या दोन मुलांची नागरिकता काय आहे? ते भारतीय नागरिक आहेत का, की त्यांच्याकडे इतर देशाचे नागरिकत्व आहे? पुढे अनेक प्रश्न येतील,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी प्रत्युत्तर देत विचारले की, जर तुम्ही माझ्या आणि माझ्या पत्नीचे शत्रू देशाचे एजंट असल्याचा आरोप सिद्ध करण्यात अयशस्वी झालात तर तुम्ही राजीनामा द्याल का? तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांवर आणि पत्नीवर प्रश्न विचाराल का? राज्य पोलिस कोळसा माफियांशी संबंधित असलेल्यांना अटक करतील का? ते आसामच्या टेकड्या उद्ध्वस्त करत आहेत आणि कोटीने पैसे कमवत आहेत?,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे असाही प्रश्न उपस्थित केला की, आसामच्या टेकड्या उद्ध्वस्त करणाऱ्या आणि कोट्यवधी पैसे कमावणाऱ्या कोळसा माफियांशी संबंधित असलेल्यांना राज्यातील पोलिस अटक करतील का?

काँग्रेस खासदार आणि पाकिस्तानमधील संबंध उघड करणार?

त्यावर हिमंता बिस्वा यांनी उत्तर दिले, “एसआयटीचा अहवाल सादर होण्याची आम्ही वाट पाहत आहोत.” त्यांनी म्हटले, मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी किंवा माझा मुलगा आणि मुलगी यांनी कधीही पाकिस्तानला भेट दिली नाही. माझी पत्नी आणि आमचे संपूर्ण कुटुंब कधीही पाकिस्तानकडून कोणताही पगार किंवा आर्थिक मदत स्वीकारण्याचा विचारही करणार नाही.” ते पुढे म्हणाले, “माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, माझी पत्नी, मुलगा आणि मुलगी भारतीय नागरिक आहेत. माझ्या कोणत्याही मुलाने कधीही भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेला नाही. उत्तर देण्याची तुमची वेळ आहे. येत्या काही दिवसांत काँग्रेस खासदार आणि पाकिस्तानमधील संबंध उघड करणारे पुरावे सार्वजनिकरित्या सादर केले जातील. १० सप्टेंबर २०२५ पर्यंत वाट पाहा,” असे ते पुढे म्हणाले.

भाजपाने गोगोई यांच्या पत्नीवर पाकिस्तान आणि आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप केला होता; हा आरोप गोगोई यांनी हास्यास्पद म्हणून फेटाळून लावला होता. २०१४ च्या निवडणुकीत लोकसभेवर निवडून आल्यानंतर गोगोई यांनी लोकसभा अध्यक्ष, गृह मंत्रालय आणि इतर संबंधित मंत्रालयांची परवानगी न घेता पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट दिली होती, असा आरोपही भाजपाकडून करण्यात आला होता. त्यांच्या या भेटीनंतर गोगोई यांच्या ‘पॉलिसी फॉर युथ’ या संघटनेने एका वृत्तपत्रात एक लेख लिहिला होता. या लेखात बीएसएफ कर्मचाऱ्यांवर बेकायदापणे देशात आलेल्या बांगलादेशी महिलांबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता.

१० वर्षांपूर्वी गौरव गोगोई यांच्या भारतातील तत्कालीन पाकिस्तान उच्चायुक्तांशी झालेल्या भेटीबद्दल फेब्रुवारीमध्ये सरमा यांनी प्रश्न उपस्थित केले होते. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरमा यांनी काँग्रेस खासदार आणि त्यांच्या पत्नीवर पाकिस्तानच्या संबंधांचा उल्लेख करून टीका केली आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतेक जण पर्यटक होते.

एलिझाबेथ गोगोई कोण आहेत?

ब्रिटनमध्ये कोलबर्न कुटुंबात जन्मलेल्या एलिझाबेथ हवामान धोरणाच्या क्षेत्रात काम करतात. एलिझाबेथ गोगोई यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एलएसई) मधून आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी २०१३ मध्ये काँग्रेस नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोई यांच्याशी लग्न केले. एलिझाबेथ गोगोई यांनी मार्च २०११ ते जानेवारी २०१५ दरम्यान क्लायमेट अँड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्क (सीडीकेएन) साठी काम केले. सीडीकेएन वेबसाइटवरील त्यांच्या प्रोफाइलनुसार, त्यांनी भारत आणि नेपाळमधील ‘सीडीकेएन’च्या कार्यक्रमाचे समन्वयन केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत काही काळ पाकिस्तानमध्ये काम केले होते. सीडीकेएनमधलं त्यांचं काम भाजपाच्या चाचण्यांखाली आलं आहे.