वर्धा : जिल्ह्यातील चारपैकी तीन विधानसभा मतदारसंघात तेली समाजाचे तीन उमेदवार घोषित झाल्याने तैलिक महासंघाचा दबाव कामी आल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. सर्वप्रथम भाजपने देवळीत राजेश बकाने यांना उमेदवारी दिली. त्याचा दबाव काँग्रेसवर पडल्याची चर्चा झाली आणि काठावर असलेल्या शेखर शेंडे यांना वर्ध्यातून उमेदवारी मिळाली. आता हिंगणघाटमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल वांदिले यांना उमेदवारी मिळाली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात पूर्वी राजू तिमांडे या तेली समाजातून आलेल्या नेत्यासच उमेदवारी मिळत होती. मात्र त्यांचे वर्तन चर्चेत आल्यानंतर भाकरी फिरणार याची चर्चा सुरू झाली होती.

दोन वर्षांपूर्वी मनसे नेते अतुल वांदिले यांची भेट माजी खासदार रामदास तडस यांनी शरद पवार यांच्याशी घालून दिली होती. आता हा घ्या आमच्या समाजाचा तगडा गडी, असा परिचय वांदिले यांचा देण्यात आला. त्यानंतर वांदिले यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी पक्षासाठी घेतलेली मेहनत, केलेली आंदोलने, राबविलेले उपक्रम, घडवून आणलेले पक्षप्रवेश यामुळे वांदिले सतत चर्चेत राहले. गाव पातळीवर सामान्यांचे राजकारण करणारा व निगर्वी असा त्यांचा परिचय दिल्या जात असतो. त्यांनी थेट विधानसभेसाठी तिकीट मिळवून अनेकांना आश्चर्यात टाकले आहे. त्यांची लढत भाजपचे समीर कुणावार यांच्याशी होणार. विधानसभा निवडणुका घोषित होताच प्रांतिक तैलिक महासंघाने प्रत्येक पक्षाने दहा टक्के उमेदवारी तेली समाजासाठी द्यावी, अशी मागणी जाहीर केली होती. प्रमुख समाज नेते रामदास तडस यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तेली समाजात अस्वस्थता पसरली होती. मात्र आता एकट्या वर्धा जिल्ह्यात या समाजाचे तीन उमेदवार प्रमुख पक्षांकडून आले आहे. त्यातही आघाडीने चार पैकी दोन ठिकाणी तेली समाजाचे उमेदवार देत युतीवर मात केली आहे.

हेही वाचा – जळगावमध्ये माजी महापौरांविरोधात माजी उपमहापौरांचे बंड

हेही वाचा – बीडमध्ये भाजपला गळती

विशेष म्हणजे विदर्भात वर्धा जिल्हा हा तेली समाजाचा गढ समजल्या जातो. पूर्वी प्रमोद शेंडे हे नेते होते. त्यानंतर रामदास तडस यांनी समाज संघटनेची धुरा हाती घेतली. तेव्हापासून हा समाज भाजप भोवती एकवटल्याचे म्हटल्या जात असते. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी तेली समाज माझा पाठीराखा, मी त्यांचा पाठीराखा असे उद्गार काढले होते. सर्वात ज्यास्त या समाजाच्या नेत्यांना तिकीट देणार, असे पण आश्वासित केले होते. वर्धा जिल्ह्यात प्रामुख्याने वर्धा, देवळी व हिंगणघाट क्षेत्रात या समाजाचे अस्तित्व पणास लागणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.