हिंगाेली : विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलून नवा उमेदवार रिंगणात उतरविण्यात आल्याने हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाची कसोटी लागली आहे. शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेच्या दोन गटांमध्येच चुरशीची लढत होणार आहे. मागील चार दशकांमध्ये एकदा निवडून दिलेल्या उमेदवाराला सलग दुसऱ्यांदा विजयाची संधी न देण्याची एक खास परंपराही हिंगाेली मतदारसंघाने यंदाही जपली आहे, हे विशेष !

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी बदलण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली. भाजपच्या दबावामुळे खासदार पाटील यांची उमेदवारी बदलण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम काेहळीकर व ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यात चुरशीची लढत होत आहे. हिंगाेली मतदारसंघ तीन जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. हिंगाेली, नांदेडसह विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचाही भाग या लाेकसभा मतदारसंघात येताे. हिंगाेली, वसमत, कळमनुरी, नांदेडमधील हदगाव व किनवट व उमरखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. कळमनुरी, हदगाव व किनवट हे आदिवासी बहुल भाग असून सर्वाधिक मराठा समाज, हटकर-धनगर, मुस्लिम समुदायाचे मतदान निर्णायक मानले जाते.

हेही वाचा – राजपूत, जाट समुदाय भाजपावर नाराज आहेत का? राजस्थान भाजपा प्रमुख सांगतात…

हिंगाेली लाेकसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या १८ लाख १७ हजार ६३४ आहे. सात लाखांच्या आसपास संख्येने असलेला मराठा मतदार मनाेज जरांगे पाटील यांच्या आंदाेलनाच्या लढ्यानंतर एकवटलेला असून त्यातील युवापिढीचा विद्यमान राज्य सरकार हे आरक्षण विराेधी असल्याचा विचार करून मतदान करण्याचा कल दिसून येत आहे. तर वंचितच्या उमेदवाराकडून घेण्यात येणाऱ्या मतांवरही बरेच अवलंबून असून मागील निवडणुकीत माेहन राठाेड यांनी एक लाख ७४ हजार मते घेतल्याने काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना पराभवाला सामाेरे जावे लागले हाेते. यावेळी ३३ उमेदवार रिंगणार आहेत. वंचितकडून बंजारा समाजातील बी. डी. चव्हाण हे उमेदवार असून त्यांच्याकडून दलितांसाेबत ओबीसी मते मिळविण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत मिळणारी मुस्लिम मते यावेळी ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता वर्तविली जाते.

हिंगाेली मतदारसंघात भाजपने डाेळा ठेवून ताे ताब्यात घेण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न चालवले हाेते. गत दीड वर्षांपासून केंद्रातील अनेक मंत्र्यांचे दाैरे वाढले हाेते. मात्र, शिंदे गटाला मतदारसंघ सुटल्यानंतरही भाजपने त्यांचे दबावतंत्र प्रभावीपणे अवलंबून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचीच उमेदवारी बदलायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाग पाडले. त्यानंतरही भाजपचे ॲड. शिवाजी जाधव यांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी मागे घेतलीच नाही, पण दोन दिवसांपूर्वी त्यांना नांदेडला बोलावून घेण्यात आले. फडणवीस यांनी कान टोचताच जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगून महायुतीचे काम करणार असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा – सॅम पित्रोदा आणि गांधी घराण्याचं नेमकं काय कनेक्शन?

मतदारसंघाचा इतिहास

हिंगाेली मतदारसंघ १९७७ साली अस्तित्वात आला. चंद्रकांत पाटील गाेरेगावकर हे जनता दलाचे पहिले खासदार. त्यांच्यानंतर काँग्रेसचे उत्तमराव राठाेड हे सलग तीनवेळा निवडून आले. त्यांच्यानंतर मात्र, एकाही खासदाराला सलग दुसऱ्यांदा निवडून दिले नाही. सूर्यकांता पाटील व शिवाजी माने हे प्रत्येकी दाेन वेळा खासदार झाले असले तरी सलग दाेन वेळा निवडलेले नाहीत. सूर्यकांता पाटील एकवेळा काँग्रेसकडून तर दुसऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आल्या आहेत. विलास गुंडेवार, सुभाष वानखेडे, राजीव सातव व हेमंत पाटील हे प्रत्येकी एकचवेळी खासदार म्हणून निवडून आले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hingoli lok sabha eknath shinde group test due to change of candidates print politics news ssb
Show comments