तुकाराम झाडे, लोकसत्ता
हिंगोली : निवडून येईल तो ग्रामपचांयत सदस्य आणि सरपंच आपल्या गटाचव्हावा म्हणून हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमास आल्यास त्या ग्रामपंचायतीसाठी ७३ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. नवनिर्वाचित सरपंचांना विकासासाठी २५ लाख आणि रस्त्यावरील पेव्हरब्लॉकसाठी ४८ लाख रुपये निधी देण्याचा निर्णय जाहीर केला. हिंगोली जिल्ह्यातील ग्रमीण भागात वर्चस्व निर्माण करण्यासाठी शासकीय निधीचा पद्धतशीर राजकीय उपयोग होत असल्याने राजकीय पटलावर भुवया उंचावल्या जात आहेत.
हेही वाचा >>> नागपूर: विधान परिषदेत विरोधकांचा वरचष्मा; बावनकुळे यांच्या प्रश्नामुळे संशयाचे वातावरण
‘सत्काराला या आणि निधी घेऊन जा’ असे घोषवाक्यच समाज माध्यमातून देत आमदार बांगर यांनी निवडून आलेले सदस्य आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी वेगळीच शक्कल लढविली आहे. दिसण्या- वागण्यापासून प्रत्येक वेळी वादग्रस्त ठरणाऱ्या बांगर यांच्यावर अलीकडे पुन्हा आरोप होऊ लागले आहेत. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी नुकतेच ते ‘पत्त्याचे क्लब’ चालवित असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर म्हणून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची अनेक दाखवू नयेत अशी चलचित्रे आपल्याकडे आहेत. तेव्हा अधिक बोलू नका, असा इशारा दिला होता. विधिमंडळाच्या आवारात त्यांचा आणि उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांचा ‘ अगावू बोलू नका’ असा एक व्हिडिओही सध्या चर्चेत आहे. संतोष बांगर यांनी आपल्या बाजूने सदस्य असावेत यासाठी निधीचा आकडा जाहीर केल्याने हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाला नवेच परिमाण मिळाले आहे. येत्या काळात गावागावातील पाणंद रस्त्याच्या निधीचेही राजकारण आता होताना दिसूलागले आहे.