स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना, भाजपने पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी आहे त्या मनुष्यबळावरच लढा देत असून काँग्रेसची मंडळी मात्र नव्या गटांचे पारायण करण्यातच व्यस्त आहे. पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतील मंडळी दुखावणार नाही, याची काळजी पक्षनिरीक्षक घेत असून याचीच प्रचिती आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या बैठकांतून समोर आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात भाजपने मागच्या निवडणुकीत पाळेमुळे रुजविण्याचा प्रयत्न केला. शून्यावरून एक अंकी, दोन अंकी संख्येपर्पंत त्यांचे बळ वाढलेले आहे. यावेळी या निवडणुकांसाठी माजी खासदार शिवाजी माने यांचाच पक्ष प्रवेश करून भाजपने जि.प.सह सर्वच निवडणुकांसाठी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भाजपमध्ये आधीच माजींचा मोठा भरणा असताना आणखी काहींना गळाला लावण्याचा प्रयत्न होत आहे. दुसरीकडे शिवसेनाही भाजपला टक्कर देण्यासाठी कुरघोडीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहे. गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात भगवा घातला जात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनाच शेवटी त्यांनी गळाला लावले.
राष्ट्रवादीत पक्षीय स्तरावर कुरबुरी आहे. मात्र, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या शब्दाबाहेर जाण्याइतपत बळ अजून कुणातही नाही. त्यामुळे त्यांनी डोळे वटारले की, ही कुरबुर शमते. त्यांनीच जर हवा दिली तर तेवढ्यापुरती ती फोफावते. पुन्हा शांत होते.
सध्या काँग्रेसची मात्र सर्वाधिक चर्चा आहे. काँग्रेसचे गट-तट मोडीत निघण्याऐवजी प्रबळ होत आहेत. वारंवार वेगवेगळ्या बैठका होत आहेत. पुन्हा एकदा मंगळवारी त्याचा प्रत्यय आला. पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे शिष्टमंडळ आले. माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर व आमदार प्रज्ञा सातव यांच्या गटाच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या. तर पालकमंत्री वर्षा गायकवाड, माजी आमदार संतोष टारफे यांच्या गटाची अनुपस्थिती मात्र खटकणारी ठरली. त्यामुळे आगामी काळात या तिसऱ्या गटासाठी स्वतंत्र बैठक घेतली गेली तर नवल नाही.
विशेष म्हणजे काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष सेनेने पळविल्यानंतर या पदावर अजून कोणाचीही वर्णी लावता आलेली नाही. तीन गटांची मर्जी राखून ही निवड करायची कशी, हा यक्ष प्रश्न श्रेष्ठींसमोर आहे. कोण्या एका नावावर एकमत होईल, याची सुतराम शक्यता नाही. तर या सर्वांवर लादण्याइतपत सक्षम चेहरा पक्षाकडे असताना त्यांचा विचार न करता स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून येण्याची क्षमता नसलेल्या काहींची नावे पुढे केली जात आहेत.
काँग्रेसने तालुका, शहर अध्यक्ष निवडीसाठी पक्षनिरीक्षक पाठवले. हिंगोलीसाठी सुरेंद्र घोडजकर, सेनगावसाठी अनिल पाटील, औंढा नागनाथसाठी अनिल मोरे, कळमनुरीसाठी अग्रवाल तर वसमतसाठी कुलकर्णी यांची नेमणूक केली. मंगळवारी कुलकर्णी वगळता इतर जण आले होते. त्यांच्या समोरही या गटा-तटाचे प्रदर्शन झाले. या मंडळींना जुना इतिहास माहितीच असेल. त्यामुळे त्यांनी जास्त खोलात न जाता दोन्ही गटांच्या लोकांच्या भेटी घेतल्या. तिसरा गट गायबच होता. यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेली ही खदखद या निवडणुकांमुळे आणखी उसळी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उद्धव ठाकरेंचा भाजपविरोधात आक्रमक आणि पाणीप्रश्नावर नरमाईचा सूर
काँग्रेस अंतर्गत गटबाजीमुळे शिवाजी माने, संजय बोंढारे, भागोराव राठोड, नारायण खेडकर, कैलास शहाणे आदींनी पक्ष सोडला. काही सोडण्याच्या तयारीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी औंढा नागनाथ, सेनगाव नगरपंचायतच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला. असे सर्व चित्र असतानाही पक्ष यातून काही धडा घेण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.