सुहास बिर्‍हाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना पालघर लोकसभा मतदार संघात महत्वाची भूमिका असलेला हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. बविआने भाजपाशी केलेली जवळीक तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र आता पक्षाने लोकसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. उमेदवार जरी जाहीर केला नसला तरी २००९ प्रमाणे उमेदवार गुलदस्त्यात ठेवून निवडणूक जिंकण्याचा ‘चमत्कार’ पक्ष नेत्यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी सक्रीय झाले असून जोरदार तयारी करण्यात येत आहे. विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदे गटात गेले असून त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून संपुर्ण मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. भाजपाने विधानसभा डोळण्यासमोर ठेवून संभाव्य उमेदवारांना पद देऊन कामे सुरू केली आहेत. तो देखील लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक प्रचाराचा भाग आहे. पक्षाचे स्थानिक नेते राष्ट्रीय कार्यक्रम विविध आंदोलने करून भाजपासाठी वातावरण तयार करत आहेत. नुकतेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना शहरात फिरून नागरिकांशी संवाद साधत मोदी प्रचाराची हवा तयार केली. कॉंग्रेस स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रम करून वातावरण तयार करत आहे. मात्र या राजकीय रणधुमाळीत वसई विरार शहरावर एकहाती सत्ता असलेला बहुजन विकास आघाडी पक्ष शांतच होता. पक्षाने विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाला साथ दिली होती. राज्यातही शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असेल याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. इतके दिवस राजकीय रणधुमाळीत शांत असणार्‍या बविआने आता लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तशा सुचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

हेही वाचा… महायुती आणि इंडिया आघाडीत उमेदवारीवरून पेच

गेल्या तीन दशकांपासून आमदार हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडीची वसई विरार शहरावर निर्विवाद सत्ता आहे. मतदारसंघाच्या पुर्नरचनेनुसार ३ मतदारसंघ तयार झाले आणि पक्षाचे सघ्या ३ आमदार आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडी हा महत्वाचा पक्ष मानला जातो. लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही वसई विरार हा मोठा असल्याने या शहराची जिल्ह्याच्या राजकारणात मोठी भूमिका असते.. मागील वर्षी पक्षाने जिल्ह्यात पदांचे वाटप केले होते. जेणेकरून पक्षाची जिल्ह्यात बांधणी करता येईल. आता लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून पक्षातर्फे लवकरच वसई विरार शहारतील कार्यकर्त्यांना पदांचे वाटप केले जाणार आहे.जे करायचं ते ऐनवेळी अशी पक्षाची रणनिती असते. हितेंद्र ठाकूर हे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. ते सांगतिल तो निर्णय अंतिम असतो. मात्र आपली भूमिका ते नेहमी गुलदस्त्यात ठेवतात आणि शेवटच्या क्षणी निर्णय जाहीर करतात. दीड वर्षांपूर्वी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी अगदी मतदान होईपर्यंत त्यांची भूमिका कुणाला माहित नव्हती. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका महत्वाची ठरणार होती. आगामी पालिका निवडणुकांची तयारी म्हणून पक्षाने लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. तशी कुठलाही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी काम सुरू करण्यात आले आहे.

बहुजन विकास आघाडीने पहिल्यांदा २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. २०१४ च्या मोदी लाटेत तसेच २०१९ च्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. यंदा बविवा लोकसभा निवडणूक का लढणार याची वेेगवेगळी कारणे दिली जात आहे. निवडणूक लढणे ही गरज आहे. निवडणूका जर लढल्या नाहीत तर कार्यकर्ते अन्य पक्षात निघून जातील , अशी पक्षाला भीती आहे.

हेही वाचा… विखे विरोधकांना एकवटण्यासाठी अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके यांचा पुढाकार

पक्षासाठी लोकसभा निवडणूक महत्वाची आहे असे पक्षाचे नेते आणि माजी सभापती निलेश देशमुख यांनी सांगितले.. २००९ मध्ये पक्षाने १५ दिवसांपूर्वी बळीराम जाधव यांची उमेदवारी जाहीर करून ती जिंकली होती. तो राजकीय चमत्कार मानला जातो. यंदा देखील राजकीय चमत्कार घडवू असे पक्षाचे कार्याध्यक्ष राजीव पाटील यांनी सांगितले. आमची तयारी सतत सुरू असते. आमचा अजेंडा हा सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून असतो. त्यांची कामे आमचे कार्यकर्ते वर्षभर करत असतात. त्यामुळे केवळ निवडणुक आली म्हणून नाही तर आम्ही कायम तयार असतो असे माजी महापौर रुपेश जाधव यांनी सांगितले.

सध्या या निर्णयामुळे पक्षात चैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. वसई विरार शहरात पदांचे प्रथमच वाटप केले जाणार आहे. यामुळे पक्ष मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना वाटतोय. गेल्या काही वर्षात शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फुटला आहे. त्यामुळे पक्षाला आपले मतदार किती आहेत त्याची चाचपणी करायची आहे. त्यावरून पुढील विधानसभा आणि महापालिका निवडणुकांचे आखाडे बांधता येणार आहे. एकंदरीत जय पराजयासाठी नाही तर एकंदरीत आपल्या पुढील राजकीय भविष्यासाठी बहुजन विकास आघाडीला ही लोकसभा निवडणूक महत्वपूर्ण ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hitendra thakur and his bahujan vikas aghadi political party preparing for lok sabha election 2024 print politics news asj
Show comments