वसई- सातत्याने भाजपाला मदत करूनही भाजपाने पक्ष आणि कुटुंब फोडल्याने आमदार हितेंद्र ठाकूर चांगलेच संतप्त झाले आहे. राजीव पाटील यांना शह देण्याबरोबरच आता भाजपाला धडा शिकविण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. त्यासाठी सर्व शक्यता तपासण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडीचा पाठिंबा घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. अर्थात त्यासाठी उद्धव ठाकरे यांची संमती मिळवणे महत्वाचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या ३५ वर्षांपासून वसई विरारच्या राजकारणात हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता आहे. स्थानिक ग्रामपंचायती,पंचायत समितीपासून महापालिकेवर त्यांचे वर्चस्व असते. सहकार, व्यापार उद्योग, शिक्षण संस्थांत त्यांचे जाळे आहे. बविआने सत्तेसोबत राहण्याचे धोरण अवलंबले होते. त्यामुळे ते काँगेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसोबत होते. मात्र राज्यातील सत्ता बदलानंतर मागील काही वर्षांपासून बविआने भाजपाची कास धरली होती. राज्यसभेच्या निवडणुका, विधानपरिषद निवडणुका, कोकण पदवीधर निवडणुकांमध्ये बविआने महायुतीच्या उमेदवारंना साथ दिली होती. राज्यातील विश्वासदर्शनक ठरावाच्या वेळी देखील बविआ शिेंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने राहिला. बविआ थेट महायुतीत नसला तरी महायुतीला साथ दिल्याने तो महायुतीचा घटक मानला जात होता. लोकसभेत तर भाजप आणि बविआ यांची अधिकृत युतीची औपचारिकता बाकी होती. मात्र ती न होता बविआने उमेदवार देऊन भाजपाला लोकसभा जिंकण्यासाठी मदत केली होती. असे सर्व आलबेल असताना भाजपाने ठाकूरांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती आणि पक्षाचे दोन क्रमांकाचे नेते असलेल्या राजीव पाटील यांना फोडले आणि ठाकूरांच्या साम्राज्याला सुरुंग लावला. यामुळे बविआला मोठा झटका लागला आहे.. भाजपाने पाठीत सुरा खुपसल्याची भावना बविआत निर्माण झाली आहे. भाजपाला धडा शिकविण्यासाठी आणि राजीव पाटील यांच्यामुळे होणारे संभाव्य नुकसान रोखण्यासाठी बविआ आक्रमक झाली आहे. बंडाच्या या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची विचामंथन करण्यासाठी महत्वाची बैठक पार पडली. भाजपाने केलेला विश्वासघात, राजीव पाटील यांच्या बंडामुळे निर्माण झालेली स्थिती आणि राजीव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर त्यांचे तगडे आव्हान कसे पेलायचे यावर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा – लोकसभेतील पराभूत डॉ. हिना गावित यांची अक्कलकुवा मतदारसंघात तयारी

राजीव पाटील यांचे बविआलाच आव्हान

हितेंद्र ठाकूरांचा थेट निवडणुकीत पराभव करू शकत नसल्याने त्यांच्याच कुटुंबातील प्रमुख असलेल्या राजीव पाटील यांना फोडून ठाकूरांच्या साम्राज्याला सुरूंग लावण्याचे भाजपाचे प्रयत्न आहे. राजीव पाटील यांची शहरात समांतर वैयक्तिक यंत्रणा कार्यरत आहे. व्यापारी, बिल्डर, ठेकेदार, उद्योगपती यांच्यामध्ये राजीव पाटील यांचे व्यावसायिक संंबंध आहे. राजीव पाटील यांच्याकडे मोठी आर्थिक शक्ती आहे. त्यांची वैयक्तिक यंत्रणा आणि नालासोपारामधील भाजपची ताकद असे दुहेरी आव्हान बहुजन विकास आघाडीपुढे आहे. नालासोपारार्‍यात राजीव पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते हे राजीव पाटील यांच्यामुळे पक्षात आहे. व्यापार उद्योग राजीव पाटील यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे राजीव पाटील यांचा मोठा फटका बहुजन विकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – बीआरएसपी विधानसभेच्या मैदानात, दीडशे जागांवर चाचपणी

वेगळ्या पर्यायांचा विचार

राजीव पाटील यांना शह देण्यासाठी बविआ वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राजीव पाटील यांना नालासोपार्‍यातून मिळणारी संभाव्य उमेदवारी रोखण्यासाठी हितेंद्र ठाकूर आपले राजकीय डावपेच खेळण्याची शक्यता आहे. राजीव पाटील आणि भाजपाचे आव्हान परतवून लावण्यासाठी एकेक मत महत्वाचे असणार आहे. यासाठी बविआ पुन्हा महाविकास आघाडीकडे जाण्याचा विचार करत आहे. राजीव पाटील यांना शह द्यायचा असेल तर महाविकास आघाडीसोबत असणे आवश्यक आहे, यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले आहे. महाविकास आघाडीकडे नालासोपारा मतदारसंघात एकही उमेदवार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला बविआची साथ देण्यात अडचण नाही, बविआचे पालघर जिल्ह्यात मतदार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना होणार आहे. नालासोपारा वसई आदी मतदारसंघ महाविकास आघाडीने बविआसाठी सोडले तर बविआच्या जिल्ह्यातील ताकदीचा फायदा उर्वरित मतदारसंघात महाविकास आघाडीला होऊ शकतो. यामुळे आता बविआ महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समजते. सध्या आम्हाला महाविकास आघाडीकडून प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यावर विचार करू असे पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकेश सावे आणि नारायण मानकर यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीकडून ठाकूरांना विरोध नाही, मात्र उद्धव ठाकरे यांचे ठाकूरांशी जुने वैमनस्य आहे. ठाकरे हे हितेंद्र ठाकूर यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यास विरोध करू शकतात. पण महाविकास आघाडीसोबत ठाकूर गेले तरच ते भाजप आणि राजीव पाटील यांचे आव्हान परतवू शकतात यावर पक्षाचे एकमत झाले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hitendra thakur tendency towards mahavikas aghadi print politics news ssb