गोंदिया : जिल्ह्याच्या नशिबी आगामी अडीच वर्षे पुन्हा ‘पार्सल पालकमंत्री’ लाभणार, हे आता स्पष्ट झाले आहे. तिरोड्यातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभेत पहिल्यांदा कमळ फुलविणारे विनोद अग्रवाल तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभेतून निवडून आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्यापैकी एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना होती. मात्र, अपेक्षाभंग झाल्याने लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांचा उत्साह मावळल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदिया जिल्ह्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनादेश दिला. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रमुख नेते खासदार प्रफुल पटेल यांचा गोंदिया हा गृहजिल्हा. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार इंजि. राजकुमार बडोले किंवा तिसऱ्यांदा आमदार झालेले भाजपचे विजय रहांगडाले यांची मंत्रिपर्दी वर्णी लागेल, असे गृहीत धरले गेले. मात्र गोंदिया जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, यामुळे जिल्ह्याच्या नशिबी पुन्हा पार्सल पालकमंत्रीच लाभणार, हे स्पष्ट झाले.

हे ही वाचा… वर्धा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर ताबा मिळविण्याचे मंत्री डॉ. पंकज भोयर यांचे लक्ष्य

२०१९ ते २०२४ या गेल्या ५ वर्षात गोंदिया जिल्ह्याला ५ पालकमंत्री लाभले. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, धर्मरावबाबा आत्राम हे पाचही पालकमंत्री जिल्ह्याबाहेरचे होते. हे पालकमंत्री २६ जानेवारी, १ मे महाराष्ट्र दिवस, १५ ऑगस्ट आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठीच जिल्ह्यात दाखल होतात आणि निघून जातात, असा जिल्हावासीयांचा आजवरचा अनुभव. त्यामुळे अशा पालकमंत्र्यांना गोंदियाकरांकडून ‘झेंडा मंत्री’ म्हणून संबोधले जाते.

हे ही वाचा… महायुतीच्या यशाचे श्रेय घेऊ पाहणाऱ्या भाजपला शिंदेंचा चाप, मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचेही योगदान

आगामी काळात जिल्ह्याला मिळणारे पालकमंत्री जरी परजिल्ह्यातील असले तरी, ते हा डाग पुसून काढणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. आणि हा डाग पुसून निघावा, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना आहे. जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली. त्यांचा उत्साह कायम राहावा, यासाठी तिन्ही पक्षांना प्रयत्न करावे लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home district gondia of praful patel will have once again outsider guardian minister print politics news asj