मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या शनिवारी रायगड दौऱ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट देणार असल्याने शिवसेना शिंदे गट व मंत्री भरत गोगावले हे अस्वस्थ झाले आहेत. या साऱ्या घडामोडींमुळे रायगडचे पालकमंत्रीपद तटकरे यांच्याकडेच कायम राहते की काय, अशी भीती गोगावले यांना वाटू लागली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी रायगड किल्ल्यावर येणार आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम संपल्यावर शहा हे खासदार तटकरे यांच्या रोहा तालुक्यातील सुतारवाडी निवासस्थानी भेट देणार आहेत. शहा यांनी तटकरे यांच्या निवासस्थानी जाण्याचा कार्यक्रम घेतल्याने शिवसेना शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. विशेषत: महाडचे आमदार व मंत्री भरत गोगावले यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच झाले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्यालाच पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे, असा गोगावले यांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी घरी येण्याचे दिलेले निमंत्रण अमित शहा यांनी स्वीकारल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. आदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण शिंदे यांनी नवी दिल्लीत तक्रार केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या २४ तासांत त्याला स्थगिती दिली होती. नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न असला तरी नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपने स्वत:कडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रायगडचे पालकमंत्रीपद आम्हाला द्या, नाशिकवर दावा करणार नाही, अशी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची भूमिका आहे. दुसरीकडे, नाशिकच्या पालकमंत्रीपदावरही शिंदे गटाचा डोळा आहे.

रायगडचे पालकमंत्रीपद मिळवायचेच हा चंग गोगावले यांनी बांधला आहे. आपणच पालकमंत्री होणार, असे त्यांनी यापूर्वीच सांगण्यात सुरुवात केली. या वादापोटी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा गेले तीन महिने कायम आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार हे स्पष्ट आहे. रायगडवर एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनी तोडगा काढावा, अशी भाजप नेत्यांची सूचना होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे व अजित पवार दोघांशी चर्चा केली. पण दोघेही रायगडच्या पालकमंत्रीपदावर आडून बसले आहेत. शिंदे व पवार यांच्यात वितुष्ट निर्माण होणे हे भाजपसाठी फायद्याचेच आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनीही या विषयाला प्राधान्य दिलेले नाही.

अमित शहा हे तटकरे यांच्या सुतारवाडी निवासस्थानी जाणार असल्याने गोगावले हे अधिक अस्वस्थ झाले आहेत. तटकरे हे आपले वजन वापरून रायगडचे पालकमंत्रीपद मुलीकडे कायम ठेवतील, अशी भीती त्यांना आहे. अमित शहा यांच्या सुतारवाडीतील भेटीच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे उपस्थित राहणार आहेत. शिंदे व गोगावले हे तेथे उपपस्थित राहणार का, याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.