जळगाव : विकास कामांसाठी नाव होण्याऐवजी जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुका काही दिवसांपासून गुंडगिरी, गुन्हेगारी यामुळे गाजत आहे. राजकीय पाठबळ असल्याशिवाय गुन्हेगारी फोफावत नसल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे परिवार यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणाची किनार वाढत्या गुंडगिरीमागे असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वापार भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ दोन पंचवार्षिकपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. खडसे परिवाराची मक्तेदारी संपल्यानंतर मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची एकहाती सत्ता आहे. विद्यार्थी दशेपासून शिवसेनेशी जोडले गेलेले आणि संघटन कौशल्याच्या जोरावर जिल्हाप्रमुखपदापर्यंत पोहोचलेले चंद्रकांत पाटील हे कधीकाळी मुक्ताईनगरात खडसे परिवाराचे खंदे समर्थक होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपपासून सेना वेगळी होण्यास खडसे हे कारणीभूत ठरल्याच्या समजातून पाटील त्यांचे कट्टर विरोधक बनले. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी खडसेंच्या विरोधात उमेदवारीही दाखल केली. मात्र, खडसेंपुढे तेव्हा त्यांचा निभाव लागला नाही.

२०१९ च्या निवडणुकीत थेट खडसेंच्या उमेदवारीलाच चंद्रकांत पाटील यांनी विरोध दर्शवला. भाजप आणि सेनेची युती झाली तरी आपण खडसेंच्या विरोधात अपक्ष लढू, अशी घोषणाही त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी खडसेंवरील रागातून अपक्ष उमेदवारी दाखल केली. राष्ट्रवादीची साथ आणि समर्थक सेना कार्यकर्त्यांचा छुपा पाठिंबा, या जोरावर त्यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केला. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यावर पाटील यांनी रोहिणी खडसे यांना पराभूत करून विजयी परंपरा कायम राखली. लागोपाठ दोनवेळा विजयी झाल्यानंतर पाटील आणि खडसे परिवारातील राजकीय शत्रुत्वाची दरी अधिकच वाढली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीतही रक्षा खडसे या भाजपच्या उमेदवार जाहीर झाल्यावर मुक्ताईनगरात शिंदे गटाचे आमदार पाटील हे त्यांचा प्रचार करण्यासाठी तयार नव्हते. रक्षा खडसे आणि आमदार पाटील यांच्यात शाब्दीक चकमकी उडाल्या होत्या. त्यामुळे महायुतीमधील तणाव वाढलेला असताना, अखेरच्या क्षणी पक्षादेश मानून पाटील प्रचारात सहभागी झाल्यानंतर दोघांमधील वादावर तात्पुरता पडदा पडला होता. मात्र, रक्षा खडसे विजयी झाल्यानंतरही दोघांमधील वितुष्ट कायम राहिले. मुक्ताईनगरात रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाल्याच्या प्रकारातील संशयित हे शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याचे आणि राजकीय दबावातून त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाईत विलंब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर खडसे आणि पाटील परिवारातील जुन्या वादाला आता पुन्हा नव्याने तोंड फुटले आहे. मंत्र्यांची मुलगी असुरक्षित असल्यानंतर सामान्यांचे काय, असा मुद्दा उपस्थित करून विरोधकांकडूनही महायुतीच्या सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही छेडछाड प्रकरणात संशयित आपल्या पक्षाचे असले तरी कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याने गुंडगिरीविरोधात सध्यातरी शिंदे गट आणि खडसे परिवार एक झाल्याचे दिसत आहे. छेडछाडीचा विषय आमदार पाटील यांना पुढील राजकारणासाठी त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत.