महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान झाले आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने आपलाच उमेदवार विजयी व्हावा म्हणून जोरदार पूर्व तयारी केल्याचे पाहायला मिळाले आहे. खबरदारी म्हणून राजकीय पक्षांनी आपल्या नेत्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘हॉटेल पॉलिटिक्स’ परतले आहे, असे म्हणायला हरकत नाही. यामागील नेमके कारण काय? यावर एक नजर टाकू या.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष या निवडणुकीत आपली शक्ती आजमावण्याच्या प्रयत्नात आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात ४८ पैकी तब्बल ३० जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले आहे, मात्र सत्ताधारी महायुतीला केवळ १७ जागांवर यश मिळवता आले आहे. २०१९ मध्ये महायुतीने ४१ जागा जिंकल्या होत्या, त्या तुलनेत यंदाचे महायुतीचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. दक्षिण मुंबईतील विधानभवन संकुलात आज सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान झाले आहे. सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. सध्या २८८ सदस्यांच्या विधानसभेचे २७४ सदस्य आहेत. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, लोकसभेवर सात आमदार निवडून आले, चार आमदारांचे निधन झाले, दोन आमदारांनी राजीनामा दिला आणि एका आमदाराला अपात्र घोषित केल्यामुळे विधानसभेचे संख्याबळ २७४ वर आले आहे. राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील ११ सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली आहे. भाजपाने पाच उमेदवार – पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, मित्रपक्ष शिवसेनेने दोन – माजी लोकसभा खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना उभे केले आहे; तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना तिकीट दिले आहे.
काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना आणखी एका टर्मसाठी उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटाने पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शरद पवार गटाने या निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला नसून शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. भाजपा १०३ सदस्यांसह विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट (३८), राष्ट्रवादी अजित पवार गट (४२), काँग्रेस (३७), शिवसेना ठाकरे गट (१५) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (१०) आमदार आहेत. त्यासह कनिष्ठ सभागृहात बहुजन विकास आघाडी (३), समाजवादी पक्ष (२), एआयएमआयएम (२), प्रहार जनशक्ती पक्ष (२), मनसे, सीपीआय(एम), स्वाभिमानी पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, आरएसपी, क्रांतीकारी शेतकरी पक्ष आणि शेकाप यांचे प्रत्येकी एक आणि १३ अपक्ष आमदारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील ‘हॉटेल पॉलिटिक्स’
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, सत्ताधारी महायुतीने आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विधानसभा सदस्य बुधवारी सकाळी विधानभवन संकुलात बैठकीसाठी जमले आणि त्यानंतर ते वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले. बुधवारी रात्री विधानभवन संकुलात भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. तेथून आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्यात आले.
दुसरीकडे, काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांच्या पक्षाच्या आमदारांसाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले आहे. काँग्रेसने आपल्या आमदारांना पक्षाच्या निर्देशानुसार मतदान करण्यास सांगणारा व्हिप जारी केला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी जारी केलेल्या निर्देशानुसार सर्वपक्षीय आमदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणे बंधनकारक आहे. पक्षाच्या निर्देशानुसार सकाळी ९ वाजता मतदान सुरू होण्यापूर्वी काँग्रेस आमदारांना मतदान प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मध्य मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांच्या आमदारांबरोबर जेवणावेळी संवाद साधला.
ठाकरे गटाचे ११ आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये आल्याची माहिती आहे. गुरुवारी, उर्वरित चार आमदार त्यांच्यात सामील झाले, अशी माहिती पक्षाच्या एका नेत्याने दिली. ठाकरे यांनी आमदारांना सांगितले की, ते त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत आणि त्यांनी मतदानादरम्यान काय करावे हे त्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “आमच्या आमदारांवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याची आम्हाला गरज वाटत नाही.”
आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज का पडली?
सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही क्रॉस व्होटिंगची भीती असल्याने त्यांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा मार्ग निवडला. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाने दावा केला आहे की, अजित पवार गटातील काही आमदार पुनरागमनासाठी त्यांच्या संपर्कात आहेत. अजित पवार गटाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकली. “विरोधी बाजूने मतदान करणाऱ्या आमदारांना तीन महिन्यांनंतर होणार्या निवडणुकीसाठी तिकीट मिळेल, असे आश्वासन दिले तरच क्रॉस व्होटिंग होईल,” असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. सभागृहातील महायुतीच्या संख्याबळामुळे महाविकास आघाडी दोन जागा जिंकण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : राहुल गांधींच्या मणिपूर दौर्यामागचा नेमका उद्देश काय? या दौर्यामुळे भाजपावर दबाव वाढणार का?
तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, पण महायुतीचे घटक पक्ष असणार्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार त्यांच्या बाजूने क्रॉस व्होट करण्याची आघाडीने शक्यता वर्तवली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, काँग्रेसचे तीन आमदार नाराज असल्याचेही वृत्त आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केला. तिसऱ्या उमेदवाराचा विजय सुनिश्चित करण्यासाठी विरोधी गटाकडे विधानसभेत संख्याबळ नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर, उद्धव ठाकरे म्हणाले होते, “आम्हाला जिंकण्याचा आत्मविश्वास नसता तर आम्ही तिसरा उमेदवार उभा केला नसता. ”