कॉंग्रेस पक्ष सध्या अनेक अडचणींमधून वाटचाल करत आहे. नक्की काय चुकते आहे आणि सुधारणा करण्यासाठी काय केले पाहिजे याचे चिंतन करण्यासाठी उदयपूर येथे काँग्रेसने चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला देशातील काँग्रेसचे प्रमुख नेते उपास्थित होते. प्रत्येक राज्यातून महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांना शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याचे प्रमुख कारण म्हणजे चिंतन शिबिरात ठरवण्यात आलेली पुढील कामाची दिशा प्रत्येक राज्यातील प्रमुख नेत्यांनी आपल्या भागातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावी.
मात्र, या शिबिरात राहुल गांधी यांनी केलेल्या एका विधानामुळे हे चिंतन शिबिर काँग्रेससाठी चिंता शिबिर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या शिबिरात राहुल गांधी म्हणाले की, “भाजपाशी लढण्यासाठी प्रादेशिक पक्षांकडे विचारधारा नाही”. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेससोबत असलेले बरेच स्थानिक पक्ष नाराज झाले आहेत. सध्या काँग्रेसला स्थनिक पक्षांच्या सोबतीची गरज असताना राहुल गांधी यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये दबक्या पाऊलांनी सुरू आहे. राहुल गांधी यांच्यासारख्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने असे विधान करणे स्थानिक पक्षांना रुचलेले नाही. सध्या अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनीच एकत्र येऊन भाजपाला रोखले आहे. त्यामुळे राहुल यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसच्या मित्रपक्षांच्या प्रतिक्रिया..
बिजू जनता दल (बीजेडी)
“सुरवातीला आम्हाला वाटले की राहुल गांधी विनोद तर करत नाहीयेत ना ?”
झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम)
“हे राहुल गांधी यांचे मत आहे आणि ते मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. परंतु त्यांना आमच्या विचारधारेवर भाष्य करण्याचा अधिकार कोणी दिला? विचारधारेशिवाय आम्ही पक्ष कसा चालवू शकतो?”
राष्ट्रीय जनता दल ( आरजेडी)
“राहुल गांधी यांचे हे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यांनी भाजपाविरुद्धच्या लढाईत प्रादेशिक पक्षांची आणि त्यांनी केलेल्या कामाची जाण ठेवली असती तर असे विधान केले नसते.”
द्रमुक (डीएमके)
“नो कॉमेंट”.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सिपीएम)
“सध्या विचारधारेचे संकट काँग्रेसवरच आहे. कारण काँग्रेस सध्या “सॉफ्ट हिंदुत्वा”सोबत फ्लर्ट करत आहे”.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर या आणि अशा अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काही पक्षांच्या नेत्यांनी यावर खुलेआम प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काही पक्षांचे नेते उघडपणे यावर बोलत नाहीत. पण ऑफ दे रेकॉर्ड ते या विधानावर संताप व्यक्त करत आहेत. देशातील काँग्रेसच्या काही प्रमुख मित्र पक्षांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. यावरून स्पष्ट होते की राहुल गांधी यांचे हे वक्तव्य त्यांना पटलेले नाही. सध्याचा राजकीय संदर्भ बघता राहुल गांधी यांनी सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. त्याबाबतच या चिंतन शिबिरात चर्चा होणे अपेक्षित होते.
उदयपूरच्या चिंतन शिबिरात काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीबाबत चर्चा आणि चिंतन करून मार्ग काढणे अपेक्षित होते. मात्र, या शिबिरातच राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य पक्षाची चिंता वाढवणारे ठरत आहे.