मधु कांबळे, लोकसत्ता
मुंबई: देशात आजच्या घडीला सर्वशक्तीमान असलेल्या भाजपला पराभूत करुन कर्नाटक राज्याची एकहाती सत्ता खेचून घेणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विजयाने आगामी राजकराणाची दिशा बदलून टाकली आहे. साहजिकच कर्नाटकच्या शेजारचेच राज्य असलेल्या महाराष्ट्रातील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होईल, याचीही चर्चा सुरु झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाची महाष्ट्रात पुनरावृत्ती घडवून आणण्यास या राज्यातील काँग्रेस पक्ष किती सक्षम आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
कर्नाटक व महाराष्ट्रात समान काही मुद्दे आहेत, ते म्हणजे भाजपने दोन्ही राज्यात फोडाफोडीचे राजकारण करुन सत्ता आपल्या हातात घेतली. दुसरा मुद्दा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला दोन्ही राज्यात मिळालेला प्रचंड प्रतिसाद. फोडाफोडीचे भाजपचे राजकारण कर्नाटकच्या मतदारांना आवडले नाही, ते या निकालातून दिसले. महाराष्ट्रातही सत्तांतरानंतर झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत व विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी काँग्रेस व मित्र पक्षांच्या बाजुने कौल देऊन तसाच संदेश दिला. कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा २१ दिवस चालली. महाराष्ट्रात १९ दिवास पदयात्रेच्या माध्यमातून राजकारण ढवळून काढले. काँग्रेसला उभारी देणारा राहुल यांचा तो दौरा होता. कर्नाटकमधील ५१ विधानसभा मतदारसंघातून पदयात्रा चालली, त्यापैकी ३९ मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळाला आहे. भारत जोडा यात्रेमुळे निर्माण झालेला राजकीय झंजावात काँग्रेसच्या बाजुने वळविण्यात येथील नेत्यांना व कार्यकर्त्यांना यश मिळाले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला ते साध्य करता येईल का, हा प्रश्न आहे.
आणखी वाचा- Karnataka : भाजपाच्या पराभवामुळे मुख्यमंत्री असलेल्या बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाचा अस्त?
कर्नाटकात काँग्रेसने एक हाती भाजपशी राजकीय लढाई करुन सत्तेचा गड जिंकला आहे. महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रातही भाजप ताकदवान पक्ष आहे. त्या पक्षाशी एकाकी झुंज देण्याची काँग्रेसची क्षमता नाही. शिवाय २०१९ च्या निवडणुकीनंतर नवी राजकीय समिकरणे तयार झाली आहे. भाजपचा मुकाबला काँग्रेसला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी म्हणून करावा लागणार आहे. इथे जागा वाटपाचा कळीचा व कलहाचा मुद्दा ठरणार आहे.
राज्यात बृहन्मुंबईसह १२ ते १३ जिल्ह्यात काँग्रेसचा अजूनही प्रभाव टिकून आहे. मुंबईत झोपडपट्टी, अल्पसंख्याक, मागसवर्गीय बहुल भागात काँग्रेसला समर्थन मिळते आहे. त्याशिवाय नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यमवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तसेच नंदुरबार व धुळे जिल्ह्याचा काही भाग काँग्रेसचा जनाधार अजूनही टिकून आहे. या भागातील मतदारसंघ मिळविण्यासाठी मित्र पक्षांबरोबर जागावाटप करताना काँग्रेसला मोठी कसरत करावी लागणार आहे.
आणखी वाचा-Karnataka Election Results 2023: राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’चे मतांमध्ये परिवर्तन
महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविताना शिवसेनेचे हिंदुत्व आणि राष्ट्रवादीचा विस्तारवाद हे मुद्दे काँग्रेससाठी अडचणीचे ठरु शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षसंघटना एकसंध असेल तर, राजकीय लढाई जिंकणे सोपे जाते. सूक्ष्म स्तरावरावरील निवडणुकीचे नियोजन अनुभवले, महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही, असे कार्यकर्ते सांगतात. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समन्वय नाही. कर्नाटकमध्ये एक वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरु केली होती. अनेक वेळा सर्वेक्षण करुन राजकीय परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात अजून संघटनात्मक पातळीवर तशी काहीही तयारी नाही, असे एका नेत्याने सांगितले. पक्षांतर्गत कलह सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस किती सक्षम आहे व रणनीती कशी आखली व राबविली जाणार आहे, त्यावर कर्नाटकच्या विजयाची पुनरावृत्ती होणार की नाही हे ठरणार आहे.