महेश सरलष्कर
भाजपमध्ये प्रत्येकाला पक्षाची शिस्त पाळूनच काम करावे लागते. प्रवक्तेपदाची जबाबदारी देताना नेता-पदाधिकाऱ्यांना रितसर प्रशिक्षण दिले जाते, पक्षाची राजकीय व वैचारिक भूमिका काय हे समजावून सांगितात. तसेच, पक्षासाठी आक्रमक मांडणी करताना संविधानाची चौकट मोडणार नाही याची प्रवक्त्याने दक्षता घेण्याची सूचना असते. इतके होऊनही प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी मर्यादेचा भंग केलाच कसा, हा प्रश्न भाजपच्या केंद्रीय स्तरावरील नेतृत्वाला सतावू लागला आहे.
वास्तविक, नड्डा यांनीच नुपूर शर्मा यांना आपल्या नव्या चमूमध्ये सामावून घेतले होते. गेल्या काही वर्षांमध्ये अनुराग ठाकूर, नुपूर शर्मा, कपिल मिश्रा, तेजस्वी सूर्या अशा बेधडक आणि आक्रमक बोलणाऱ्या तरुण नेत्यांची फौज तयार केली आहे. वृत्तवाहिन्यांवरच नव्हे तर, जाहीर सभांमध्ये या नेत्यांनी प्रक्षोभक भाषणेही केली आहेत. मात्र, कोणत्याही धर्माचे संस्थापक-धर्मगुरू यांच्यावर थेट भाष्य केले नाही. या सर्व नेत्यांनी पक्षाची शिस्त पाळली होती. पण, नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांनी पक्षाची चौकट मोडून वैयक्तिक मते मांडल्यामुळे पक्षाला त्यांच्याविरोधात कारवाई करावी लागली आहे. नुपूर शर्मा यांनी वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात बोलताना प्रेषितांवर भाष्य केले होते. ज्ञानवापी मुद्द्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ व भाजपच्या कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. प्रत्येक मशिदीमध्ये शंकराची पिंड शोधत फिरू नये, असे भागवत यांनी नागपूरमधील संघाच्या कार्यक्रमात स्पष्ट केले होते. पक्षाची शिस्त मोडून वैयक्तिक मते मांडल्यामुळे तसेच, संघाने दिलेल्या सूचनेनंतर भाजपने नुपूर शर्मा यांना निलंबित करून स्वतःला या वादापासून अलिप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सामान्य कार्यकर्त्याला निलंबित केल्याची भावनाही व्यक्त झाली आहे. दिल्लीतील पक्षनेते कपिल मिश्रा यांनी तर उघडपणे नुपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे. आखातातील देश हे इस्लामिक असून मुस्लिमांच्या हक्कांसाठी ते आक्रमकपणे बोलतात. आता ते त्यांच्या देशात काम करणाऱ्या भारतीयांच्या नौकऱ्यांवर गदा आणण्याची भाषा करत आहेत. त्यांच्या देशात हिंदूंना दुय्यम नागरिक म्हणूनच वागवले जाते, असे मिश्रा यांचे म्हणणे आहे. नुपूर शर्मा हिंदूंच्या बाजूने बोलत असतील तर, एकप्रकारे पक्षाची भूमिका त्या मांडत होत्या. मग, त्यांच्यावर कारवाई का केली, असा अप्रत्यक्ष प्रश्न मिश्रा यांनी विचारला आहे. हजारो कार्यकर्ते पक्षाची बाजू मांडत असतात, नुपूर शर्माही त्यापैकी एक आहेत. त्यांचे निलंबन करून पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांच्या विश्वासालाही तडा दिल्याचे मत पक्षाचे पदाधिकारी प्रवीण चौधरी यांनीही जाहीरपणे व्यक्त केले आहे. नुपूर शर्मांच्या निलंबनावर पक्षांतर्गत नाराजी असली तरी, केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाला आव्हान देता येत नसल्याने अन्य प्रवक्त्यांनी मौन बाळगणे पसंत केले आहे.