BJP : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धोबीपछाड देत भाजपा महायुतीने २३९ जागा जिंकल्या आहेत. यामुळे महाविकास आघाडीची राज्यात धूळधाण उडाली आहे. महाराष्ट्र विधानसभेत सत्ता मिळवण्यासाठी १४५ ही आमदारसंख्या आवश्यक असते. मात्र भाजपासह ( BJP ) महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत २३९ ची संख्या गाठली आहे. या आमदारांमध्ये भाजपाचे १३२ आमदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्याचा सर्वात जास्त फायदा भाजपाला झाला आहे. कसा ते आपण जाणून घेऊ.
जून २०२२ ला काय घडलं?
२१ जून २०२२ या दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड केलं. शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या विरोधात शड्डू ठोकत त्यांनी थेट शिवसेनेतले ४० आमदार घेऊन हे बंड केलं. शिवसेनेतलं हे आजवरचं सर्वात मोठं बंड ठरलं. त्यानंतर एकनाथ शिंदे काय करणार हा प्रश्न होता. पण ते भाजपासह गेले. २९ जून २०२२ ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर १०५ आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड म्हणून याकडे पाहिलं गेलं. महाविकास आघाडीचा जो प्रयोग लोकांनी पाहिला होता त्या प्रयोगाला भाजपाने ( BJP ) दिलेलं हे उत्तर होतं.
२ जुलै २०२३ ला काय घडलं?
यानंतर बरोबर एक वर्ष दोन दिवसांनी महाराष्ट्र दुसऱ्या राजकीय भूकंपाला सामोरा गेला. २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि महायुतीच्या सरकारमध्ये ते सहभागी झाले. ४१ आमदारांना त्यांनी बरोबर आणलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचं बळ चांगलंच वाढलं.
शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्याचा फायदा भाजपाला
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाल्यानंतर दोन्ही पक्षातले एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांच्यास आलेले आमदार सत्तेत आले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडची आमदारसंख्या कमी झाली. दोन स्थानिक पक्षांची शकलं झाल्याने भाजपापुढे आव्हान फक्त काँग्रेसचं उरलं होतं. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना लोकसभेला झाला तेव्हा भाजपा आणि महायुतीला फक्त १७ जागा मिळवता आल्या होत्या. मात्र त्यावेळी भाजपाने ( BJP ) सावध होत विधानसभेला सर्वसमावेशक अशी कामगिरी केली. दोन्ही पक्षांना बरोबर घेतलं आणि विजय फक्त खेचून आणला नाही तर एखाद्या विजयाचा करीश्मा काय असतो ते दाखवून दिलं. त्यामुळे या दोन पक्षांना बरोबर घेणारा भाजपा हा सरस पक्ष ठरला.
विधानसभा निवडणुकीत पक्षीय बलाबल कसं आहे?
भाजपा -१३२
शिवसेना (एकनाथ शिंदे) – ५७
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४१
महाराष्ट्रात काय होणार याचे विविध अंदाज लढवले जात होते, तसंच एक्झिट पोल्सनीही त्यांचे अंदाज वर्तवत महायुतीला यश मिळेल असं म्हटलं होतं. मात्र एक्झिट पोल्सने जे अंदाज वर्तवले ते साधारण १६० जागांपर्यंत होते. काही एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीची सत्ता येईल असंही म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं आहे. २३९ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. इतकंच नाही तर दोन पक्ष फुटल्याने जो सर्वाधिक फायदा झाला तो महायुतीतल्या भाजपालाच ( BJP ). कारण भाजपाच्या ( BJP ) १३२ जागा निवडून आल्या आहेत. त्यांनी १४८ जागा लढवल्या होत्या, ज्यापैकी १३२ जागा निवडून आल्या आहेत.