K C Tyagi : जदयू चे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा रविवारी राजीनामा दिला. २००० पासून जद यूच्या पदावर के.सी. त्यागी ( K C Tyagi ) होते. २०२३ मधला २ महिन्यांचा कालावधी वगळला तर या पदाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. मी सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतो. असं त्यांनी म्हटलं होतं. के. सी. त्यागी ( K C Tyagi ) हे पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत. तरीही त्यांना अशा प्रकारे राजीनामा द्यावा लागल्याने प्रश्न निर्माण होतो आहे.
के.सी. त्यागी यांच्या राजीनाम्याची चर्चा
जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार के.सी. त्यागी ( K C Tyagi ) यांना राजीनामा त्यांच्या परखड स्वभावामुळे त्यांना द्यावा लागला आहे. भाजपाविरोधात आक्रमक भूमिका मांडल्याने आणि काही संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य केल्याने त्यांनी एनडीएत जदयूच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यांच्या राजीनाम्या मागे हे नाट्य आहे असं सांगण्यात आलं.पक्षातल्या सूत्रांनी असंही सांगितलं की के.सी. त्यागी ( K C Tyagi ) हे आदरणीय नेते आहेत. मात्र त्यांनी अशी काही विधानं केली ज्या विधानांमुळे पक्षाचे मुख्य नेते अर्थात नितीश कुमार अडचणीत आले. नितीश कुमार यांचा सल्ला न घेता त्यांनी ही वक्तव्यं केली. के. सी. त्यागी यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे एनडीएतल्या जदयूच्या अडचणी वाढल्या, असं त्यांच्या पक्षातल्या एका सूत्राने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
हे पण वाचा- जेडीयूचा विरह नि प्रशांत किशोरांचा नवा राजकीय पक्ष; बिहारमधील राजकीय पेचात तेजस्वी यादव काय करणार?
इस्रायल हमास युद्धावर के.सी. त्यागी यांनी जी भूमिका मांडली ती एनडीएच्या भूमिकेच्या विरोधात जाणारी होती. केंद्र सरकारने एक महत्त्वाची भूमिका मांडली होती. त्याविरोधात बोलणं, विरोधात बोलणाऱ्यांसाठी लंच पार्टी ठेवणं हे सगळं के. सी. त्यागींच्या अंगलट आलं असं एका नेत्याने सांगितलं. अर्थात यापुढे या नेत्याने असंही सांगितलं की भाजपाकडून आमच्यावर के.सी. त्यागींना पदावरुन काढण्यासाठी कुठलाच दबाव नव्हता.
त्यागी यांची अस्वस्थता वाढल्याने राजीनामा?
काही वादग्रस्त मुद्द्यांमध्ये बचावात्मक भूमिका घेणं हे के.सी. त्यागींना मान्य नव्हतं. त्यांची अस्वस्थता वाढली होती. खासकरुन जानिहाय जनगणनेबाबत त्यांनी जी मतं मांडली त्यामुळे त्यांना पद सोडायला सांगितलेलं असू शकतं असं या नेत्याने म्हटलं आहे. के. सी. त्यागी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पक्षातले दुसरे नेते राजीव रंजनप्रसाद यांची निवड राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून करण्यात आली आहे.
बिहारमध्ये काय चर्चा आहे?
बिहारमधले अनेक नेते असंही म्हणत आहेत की के.सी. त्यागींनी राष्ट्रीय प्रवक्तेपद सोडणं ही मोठी घटना आहे. कारण त्यागी हे बहुदा एकमेव असे नेते होते जे पक्षाची बाजू योग्य पद्धतीने मांडू शकत होते. तसंच त्यागी यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हाही महत्त्वाचं वक्तव्य केलं, त्यागी म्हणाले, “पक्षाच्या नव्या टीममध्ये मी दीर्घकाळ राहिलो. नितीश कुमार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मला वाटतं की पक्षात आता माझी जबाबदारी मी खूप सांभाळली त्यामुळे मी थांबतो आहे.” असं त्यागी यांनी म्हटलं होतं.