नागपूर: नागपूरमध्ये दंगलीत झालेल्या सांपत्तिक हानीची भरपाई, दंगेखोरांची संपत्ती विकून केली जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये केली. याच दिवशी या दंगलीतील पहिल्या मृत्यूची नोंद झाली. त्याच नाव इरफान अन्सारी. याच्या जीवाची भरपाई करण्यासाठी सरकार कोणाची संपत्ती विकणार? असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.

इरफानच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्याचा दंगलीशी काही संबंध नव्हता. तो रेल्वे स्थानकावर चालला होता. संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. शनिवारी त्याच्या मृत्यू झाला. याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात होते. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दंगलीत झालेल्या नुकसानाची भरपाई दंगेखोरांकडू करणार, त्यांनी केली नाही तर त्यांची संपत्ती विकणार, असे  जाहीर केले.

मुख्यमंत्री पहिल्या दिवशीपासूनच दंगल पूर्वनियोजित होती , असे सांगत आहेत. एका विशिष्ट गटाकडे त्यांचा रोख आहे. जाळपोळ हिंसाचार यासाठी दोन्ही गट जबाबदार असल्याचे पोलीस तपासातून सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत आहे. दंगलीत बळी गेलेल्या इरफानचा मृत्यू दुसऱ्या गटाने केलेल्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच त्यांच्या जीवाची भरपाई करण्यासाठी पोलिसाना या मारहाणीच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

एक विशिष्ठ समुहच दंगलीसाठी कारणीभूत आहे हे बिंबवण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवरून केले जात आहे. पोलिसांच्या कारवाई भेदभाव पूर्ण असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात पोलिसांकडून झालेल्या विलंबावर सरकारकडून बोलणे टाळले जात आहे. चादर जाळल्या प्रकरणी तक्रार दाखल होताच संबंधितांवर कारवाई करण्यात आली,असा दावा मुख्यमंत्र्यांनी शनिवारी पुन्हा केला.

पण दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुस्लिम समाजातील बृध्दीजीवींच्या पत्रकार परिषदेत त्यांनी कारवाईला विलंब झाल्याचा दावा केला होता. दंगलीसाठी हेच प्रमुख कारण ठरले, असे हिंसाचार ग्रस्त भागातील रहिवासी सांगतात. ही बाब खरी मानली तर दंगल पेटण्यापूर्वी ती आटोक्यात आली असती व जाळपोळीच्या घटना घडल्या नसत्या आणि नुकसान भरपाई करण्यासाठी सरकारला कोणाची संपत्ती विकण्याची गरज पडली नसती. 

सरकारच्या म्हणण्यानुसार दंगल पूर्वनियोजित कट होता तर पोलिसांना त्याची खबरबात नव्हती हे त्यांचे अपयश ठरते. त्यामुळे जाळपोळ व झालेल्या नुकसानासाठी ते करणा-या इतकेच सुरक्षा यंत्रणा सारख्या जबाबदार ठरतात.  त्यामुळे नुकसान भरपाईसाठी संपत्ती विकायची झाल्यास त्याची यादी लांब असेल. इरफानच्या कुटुंबीयांची झालेली हानी न भरून निघणारी आहे., असे बोलले जात आहे.