लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसने राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी महाविकास आघाडीत लढण्यासाठी किती जागा मिळणार हा प्रश्न पक्षाच्या नेत्यांना सतावत आहे. सांगलीवरून दिल्लीतील नेत्यांनी शिवसेनेपुढे माघार घेतली होती. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये, अशीच पक्षाचे नेते अपेक्षा करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक १३ जागा काँग्रेसला मिळाल्या. भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून येतील, असे चित्र होते. पण महाविकास आघाडीने भाजपला चांगलाच दणका दिला. भाजपचे फक्त नऊ खासदार निवडून आले. यातूनच महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विधानसभेतही लोकसभेची पुनरावृत्ती होईल, असा महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास वाटतो.

आणखी वाचा-जागावाटपाच्या वाटाघाटींसाठी काँग्रेसची १० नेत्यांची समिती; पटोले, थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश

महाविकास आघाडीत जागावाटप ही मूळ डोकेदुखी आहे. लोकसभेच्या वेळी आम्ही कमी जागा लढलो असलो तरी विधानसभेत योग्य जागांवर लढू, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाने आधीच जाहीर केले आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा उद्धव ठाकरे असावा, असे खासदार संजय राऊत यांनी सूचित करीत शिवसेनेला चांगले प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट, शेकाप, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी अशा विविध मित्र पक्षांना जागा सोडाव्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकशाही आघाडी असताना जागावाटपात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहत असे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी कितीही विरोध केला तरीही शरद पवार हे दिल्लीत वजन वापरून जागावाटपात मनासारखे करून घेत असत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील सर्व नेत्यांनी विरोध करूनही सांगलीची जागा दिल्लीतील नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडली होती. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांना विनंती केल्याने सांगलीच्या जागेवर पक्षाला पाणी सोडावे लागल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले होते. या वेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांशी वाटाघाटी करताना काँग्रेसची कसोटी लागणार आहे. काँग्रेसने जागावाटपासाठी १० नेत्यांचा समावेश असलेली समिती नियुक्त केली आहे. या समितीतील सदस्यांना वाटाघाटी करताना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. पूर्वानुभव लक्षात घेता राज्यातील नेत्यांनी कितीही ताणले तरी दिल्लीचा सूर नेहमीच नरमाईचा असतो, अशी नेतेमंडळींची पंचाईत होते.

आणखी वाचा-‘भाजपने विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवाव्यात’; खासदार नारायण राणे यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाकडून नापसंती

काँग्रेसला विदर्भात चांगले यश मिळाले. विदर्भातील १० पैकी पाच जागांवर काँग्रेसो खासदार निवडून आले आहेत. विदर्भात जास्त जागा मिळाव्यात, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. विदर्भात शरद पवार गट तसाही कमकुवत आहे. शिवसेना ठाकरे गटाची पश्चिम विदर्भात काही प्रमाणात ताकद आहे. यामुळे विदर्भात तरी राष्ट्रवादी व शिवसेनेने काँग्रेसला मुक्तवाव द्यावा, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. मराठवाडा, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातही काँग्रेसचे अधिक जागांचे लक्ष्य आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात काँग्रेसची ताकद तुलनेत कमी आहे. यामुळेच काँग्रेसला किती जागा मिळतात आणि त्यातील निवडून किती येतात यावरच पक्षाची सत्तेतील गणिते अवलंबून आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many seats will congress get to fight in the assembly print politics news mrj