पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ३१ मे रोजी त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील अजमेर येथे एक जाहीर सभा घेतली. मोदी यांनी पुश्कर येथील ब्रह्मा मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर जाहीर सभेला संबोधित केले. आगामी काळात राजस्थानमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही सभा महत्त्वाची मानली जाते. या जाहीर सभेत मोदींनी त्यांच्या सरकारच्या काळात झालेल्या चांगल्या निर्णयांची माहिती दिली. त्यांचा अधिकतर वेळ काँग्रेसच्या काळातील कामांशी तुलना करण्यात खर्ची झाला. मोदींचा राजस्थानमधील दौरा हा राज्यातील भाजपा संघटनेसाठी संदेश असल्याचे मानले जाते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना दिलेले महत्त्व ही लक्षात घेण्यासारखी बाब होती. राजे या पंतप्रधान मोदी यांच्या शेजारी बसल्या होत्या.
जाहीर सभेच्या एक दिवस आधी वसुंधरा राजे यांनी सभास्थळी अचानक भेट दिली. सभेच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. राजे मोदी यांना आपला नेता मानत नाहीत, हा गैरसमज त्यांनी आपल्या कृतीतून दूर केला. राजकीय जाणकार सांगतात की, कर्नाटकच्या निकालानंतर भाजपाने नव्या नेतृत्वावर विसंबून राहण्याच्या आपल्या रणनीतीमध्ये बदल केला आहे. राजे यांना नेतृत्व देऊन राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाच्या समन्वयाने राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांना भाजपा सामोरे जाऊ शकते. ७० वर्षीय राजे यांच्या नेतृत्वात करिष्मा असून त्या एकमेव महिला राजकारणी आहेत, ज्यांच्यापाठीशी एक मोठा वर्ग आहे.
मग दोन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या वसुंधरा राजे यावेळीदेखील भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात? अजमेर येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी वसुंधरा राजे यांनी काही मिनिटे भाषण केले. त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थित श्रोत्यांनी राजेंच्या नावाच्या घोषणा दिल्या. त्याचेवळी राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते राजेंद्र सिंह राठोड आणि वसुंधरा राजे यांचे एकेकाळचे सहकारी मात्र आता विरोधक झालेल्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाने घोषणाबाजी करताना दिसले.
आगामी निवडणुकीत भाजपाचा विजय झाला तरी बहुमताच्या आकड्यापुढे जाण्यात भाजपासमोर अनेक आव्हाने आहेत. २०१३ च्या निवडणुकीत वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने १६३ जागा जिंकल्या होत्या. वसुंधरा राजे यांचे राज्यातील विरोधक सांगतात की, पक्षश्रेष्ठींनी वसुंधरा राजे यांना अद्याप निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह वसुंधरा राजे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची भूमिका काय असेल हे जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत वसुंधरा राजे त्यांच्या स्वतःच्या रणनीतीनुसार काम करत राहतील.
आपल्या भाषणात मोदी यांनी राजस्थानचे कौतुक केले. राजस्थान ही शूरवीरांची भूमी आहे असे सांगत मोदी म्हणाले की, भाजपा सरकारने वन रँक, वन पेन्शन ही योजना लागू केली. जी काँग्रेस सरकारने अनेक दशके अमलात आणली नव्हती. मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसवर नेहमीप्रमाणे जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कल्याणकारी योजनांवर टीका केली. २०१८ साली काँग्रेसने १० दिवसांचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण झाले का? असा प्रश्न मोदींनी उपस्थित लोकांना विचारला. यावर उपस्थित श्रोत्यांनी ‘नाही’ असा नारा देत उत्तर दिले.
हे वाचा >> पायलट-गेहलोत यांच्यात समेट घडवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू, खरगे दोन्ही नेत्यांना भेटणार!
यानंतर मोदींनी या दशकातील पुढी दहा वर्ष भारतासाठी विविध क्षेत्रांकरिता कशी महत्त्वाची आहेत, हे सांगितले. यामध्ये त्यांनी राजस्थानच्या पर्यटन विभागावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, असे सांगितले. मोदींनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. तसेच आमच्या काळात आम्ही भ्रष्टाचाराला अजिबात थारा देणार नाही, असे सांगितले. यावरून निवडणुकीत भाजपाकडून गेहलोत यांच्या भ्रष्टाचारावर टीका करण्यात येईल, असे चित्र दिसते. राजस्थानमध्ये गेहलोत-पायलट यांच्या राजकीय वाद भाजपासाठी फायद्याचा आहेच, त्याशिवाय भाजपा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रान उठवेल असे चित्र दिसते.