उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांचा विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे. धामी यांनी चंपावत मतदार संघातून विधासभेची पोटनिवडणूक लढवली होती. या विजयानंतर त्यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे 

पोटनिवडणुकीच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय

उत्तराखंडमधील पोटनिवडणुकीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. धामी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा ५५,००० मतांनी पराभव केला आहे. २०१२ मध्ये सितरगंज पोटनिवडणुकीत विजय बहुगुणा यांनी मिळवलेला विजय हा सर्वात मोठा विजय मानला जात होता.  त्यांनी त्यावेळी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेद्वारावर ३९, ९५४ मतांनी विजय मिळवला होता. बहुगुणा त्यावेळी मुख्यमंत्री होते.

अनामत रक्कम जप्त

धामी यांना एकूण मतदानाच्या ९२.९४% म्हणजेच ५८,२५८ मते मिळाली. धामी यांच्यासमोर निवडणूक लढवणाऱ्या तिन्ही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. दुसऱ्या क्रमांकवर असणाऱ्या कॉंग्रेसच्या निर्मला गेहतोरी यांना केवळ ३,२३३ मते मिळाली. मतमोजणी दरम्यान धामी यांनी सर्वच्या सर्व १३ फेऱ्यांमध्ये आघाडी मिळवली होती. पहिल्या फेरीत धामी यांना ३,८५६ मते मिळाली तर गेहतोरी यांना १६४ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत धामी यांना ३,५७९ मते तर गेहतोरी यांना १४८ मते मिळाली. सुरवातीपासून मिळालेली आघाडी धामी यांनी शेवटपर्यंत कायम राखली. पोस्टल मतदानवरही धामी यांचीच पकड दिसत होती.

विधानसभा निवडणुकीत धामी यांचा पराभव झाला होता

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७० पैकी ४७ जागा जिंकून इतिहास रचला होता. मात्र या निवडणुकीत पुष्कर सिंग धामी यांचा खतीमा विधानसभा मतदार संघातून पराभव झाला होता. काँग्रेसच्या भुवनचंद्र कापरी यांनी धामी यांचा पराभव केला होता. पराभव होऊनही उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची माळ धामी यांच्या गळ्यात पडली. धामी यांनी २३ मार्च रोजी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांना ६ महिन्यांच्या आत निवडणूक जिंकणे आवश्यक होते. धामी यांच्यासाठी चंपावत येथील आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत धामी यांनी विक्रमी विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपाने मतांची हेराफेरी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसनेसुद्धा निर्मला गेहतोरी यांच्या रूपाने तुलनेने कमकुवत असणारा उमदेवर देऊन धामी यांना पुढची चाल दिली. पोटनिवडणुकीच्या आधी एका काँग्रेस नेत्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगीतले होते की “या निवडणुकीत धामी यांचा विजय कमीत कमी मतांनी कसा होईल यावर काँग्रेस पक्ष लक्ष देणार आहे”. मात्र धामी यांचे मताधिक्य बघता या पातळीवरसुद्धा काँग्रेसची निराशाच झाली असे म्हणावे लागेल.

Story img Loader