Allu Arjun vs Revanth Reddy: दाक्षिणात्य सिनेमा, त्यातील कलाकार आणि दक्षिणेतील राजकारण यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असल्याचे अनेकदा दिसून आलेले आहे. सध्या तेलंगणातील राजकारणही अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याचा चित्रपट ‘पुष्पा २ – द रुल’भोवती फिरताना दिसत आहे. ४ डिसेंबर रोजी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा सिनेमासह कोणत्या वादाला तोंड फुटणार आहे, याची कल्पना खुद्द अल्लू अर्जुननेही केली नसेल. ‘पुष्पा २’ चित्रपट संपूर्ण देशभरात हिट ठरला. अभिनेता अल्लू अर्जुन या निमित्ताने नायक म्हणून भारतातील अनेक राज्यांत ओळखला जाऊ लागला. पण, प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ५ डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर अल्लू अर्जुनच्या भोवती वाद वाढत गेले. या चेंगराचेंगरीत एक महिला मृत्युमुखी पडली, तर तिचा नऊ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. चेंगराचेंगरीच्या प्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली. मात्र, त्याच दिवशी तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला. मात्र, एक रात्र त्याला चंचलगुडा पोलिस स्थानकात घालवावी लागली.
चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची अटक आणि सुटका आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विधानांमुळे या प्रकरणावरून जोरदार राजकारण सुरू झाले. चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री अभिनेता अल्लू अर्जुनवर वारंवार दोषारोप करत आहेत; तर तेलंगणातील विरोधी पक्ष भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि भाजपाने सत्ताधारी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
भारत राष्ट्र समितीला मिळाला आयता मुद्दा
तेलंगणात २०२३ साली झालेल्या विधानसभा आणि २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एक दशक राज्यात सत्ता राबविणाऱ्या भारत राष्ट्र समितीचे अक्षरश: पानिपत झाले. त्यानंतर बीआरएस पक्षात एकप्रकारची मरगळ दिसत होती. मात्र, या मुद्द्यामुळे आता पक्षात पुन्हा एकदा उत्साह संचारलेला दिसत आहे. याबाबत बोलताना बीआरएसच्या एका नेत्याने सांगितले की, या दुर्घटनेचे आम्ही राजकारण करू इच्छित नाही. कायदा सर्वांसाठीच समान आहे, पण ज्याप्रकारची भाषा राज्य सरकारकडून वापरली गेली आणि त्यांच्याकडून जी कृती झाली, त्यावर आम्ही गप्प बसू शकत नाही.
काँग्रेस पक्षाला एकहाती सत्ता मिळवून दिल्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घेतलेले काही निर्णय वादात अडकले असून त्यावर विरोधकांना आयतीच संधी मिळाली. हैदराबाद आपत्ती प्रतिसाद आणि मालमत्ता संरक्षण मंडळ (HYDRAA) या संस्थेद्वारे काही घरांचे पाडकाम करण्यात आले. मात्र, रेवंत रेड्डी यांच्या नातेवाईकांना कारवाईतून वगळण्यात आले, ज्यामुळे त्यांच्यावर जाहीर टीका झाली. तसेच मुसी पुनर्विकास प्रकल्पामुळे जवळपास १६ हजार कुटुंबीयांचे स्थलांतर करावे लागले आणि जमीन अधिग्रहण विषयावरून लागरचेर्ला येथेही वाद उफाळून आला.
भारत राष्ट्र समितीच्या अंतर्गत सूत्रांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, राज्य सरकारबद्दल अनेक विषय आहेत, ज्यांच्यावर टीका होत आहे. पण, सरकारने अल्लू अर्जुनला सतत लक्ष्य केल्यामुळे आता काँग्रेसला सत्तेत आणण्याची चूक लोकांच्या लक्षात आली आहे. बीआरएसच्या एका नेत्याने सांगितले, “मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या निर्णयामुळे सामान्य लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहेच. आता ते सेलिब्रिटीबरोबरही तसेच वागत आहेत. जर असेच सुरू राहिले तर पारंपरिक काँग्रेस मतदारही यापुढे त्यांना मतदान करणार नाही.” आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे पडसाद पाहायला मिळतील, असेही या नेत्याने सुचित केले.
विधानसभा आणि लोकसभेत हाराकिरी झाल्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे त्यांच्या अतिथीगृहातून फारसे बाहेर आलेले नाहीत. विशेषतः लोकसभा निवडणुकीतील तेलंगणातील १७ जागांपैकी त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. मात्र, अल्लू अर्जुनच्या विषयामुळे बीआरएस पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. बीआरएसच्या एका नेत्याने सांगितले की, अल्लू अर्जुनच्या प्रकरणानंतर पक्षाच्या नेत्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे, जो आता खाली कार्यकर्त्यांमध्येही झिरपत आहे. काही महिन्यांपूर्वी पक्षाचे भवितव्य काय असेल, याची चिंता आम्हाला सतावत होती. मात्र, आता पक्षासमोर नवे ध्येय आहे. अर्थात, पक्षाचा कृती आराखडा आता तयार झालेला नसला तरी मंडल, जिल्हा स्तरावरील कार्यकर्ते कामाला लागले आहेत, त्यामुळे पुढील काळात सरकारला आणखी घेरले जाईल.
दुसरीकडे रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी काँग्रेसचे मंत्री दसारी अनुसया यांनी अल्लू अर्जुनला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुनने चंदन तस्कराची भूमिका वठवली होती. याचा हवाला देताना मंत्री अनुसया म्हणाले की, तस्कर हा आदर्श असू शकतो का? निजामाबाद ग्रामीणचे आमदार आर. भूपती रेड्डी यांनी सांगितले की, अर्जुन हा आंध्रचा रहिवासी असून तो सध्या तेलंगणात राहत आहे. भूपती यांनी अल्लू अर्जुनचा उल्लेख रस्त्यावरचा अभिनेता असा केला. तसेच जर तुम्ही मुख्यमंत्र्यांचा अवमान करत असाल तर तुमचे चित्रपट या राज्यात चालू दिले जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.
रेवंत रेड्डी यांच्या जिल्ह्यातील मेहबूबनगर येथील बीआरएसच्या एका नेत्यांनी म्हटले की, अल्लू अर्जुनशी संबंधित वादानंतर आता आमच्या नेत्यांना लोकांची समजूत घालणे सोपे जाणार आहे. सरकारच्या धोरणांमुळे जनता आधीच त्रस्त होती. आता अल्लू अर्जुनच्या वादानंतर लोक स्वतःहून आमच्याकडे येत आहेत. बीआरएस पक्षाला हेच तर हवे होते.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या जवळच्या एका नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री अल्लू अर्जुनच्या विषयावर मागे हटण्यास तयार नाहीत. गरिबांचा कैवारी अशी रेवंत रेड्डी यांची प्रतिमा तयार करण्यात पक्ष गुंतला आहे. दुसरीकडे बीआरएसने असाही आरोप केला की, जनतेशी निगडित महत्त्वाच्या प्रश्नांपासून लक्ष वळविण्यासाठी काँग्रेसने जाणूनबुजून अल्लू अर्जुनच्या विषयाला हवा दिली. “जर चेंगराचेंगरीच्या प्रकरणावर सरकार इतकेच गंभीर आहे तर रेवंत रेड्डी यांनी विधानसभेत यावर तासभर चर्चा का केली नाही? तसेच चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाच्या उपचाराचा खर्च एक कोटी इतका आला आहे, सरकारने हा खर्च का दिला नाही. पण, लागचेरलासारख्या इतर गंभीर विषयावरून लक्ष वळविण्यासाठीच फक्त अल्लू अर्जुनचा वापर केला जात आहे”, असे बीआरएस नेते दासोजू श्रवण यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.
अल्लू अर्जुनचा वाद आता शेजारच्या आंध्र प्रदेश राज्यातही पोहोचला आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्याशी अल्लू अर्जुनचे निकटचे संबंध असल्यामुळेच त्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.