राजेश्वर ठाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तयारीत युवकांचा सहभाग वाढावा म्हणून अ.भा.काँग्रेस समितीने प्रदेश युवक काँग्रेसला “युथ जोडो-बुथ जोडो” कार्यक्रम दिला आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या कार्यप्रणालीवर पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याने युवक काँग्रेसला दीड वर्षांपूर्वी सुरू झालेले “माझा गाव माझी शाखा” अभियान प्रभावीपणे राबवता आले नाही. त्यामुळे आता हा नवीन कार्यक्रम युवक काँग्रेस कितीपत यशस्वीपणे राबवू शकेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कुणाल राऊत यांनी ४५ हजार गावात ‘माझा गाव माझी शाखा’ अभियान राबवण्याची घोषणा केली होती. त्याची सुरुवातही जोमाने झाली. परंतु काहीच दिवसात यात शिथिलता आली. अभियानाला गती देण्यासाठी आवश्यक दौरे राऊत यांनी थांबवले. शिवाय त्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्याचे प्रतिबिंब मुंबईतील टिळक भवनात झालेल्या युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.वी. श्रीनिवास यांच्या कार्यक्रमात उमटले. या कार्यक्रमात राऊत विरोधकांनी गोंधळ घातला. परस्परांवर खुर्च्या फेकल्या. चार उपाध्यक्षांनी थेट राऊत यांना बदलण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्षांकडे केली होती. यावरून कुणाल राऊत यांच्या विरोधात संघटनेतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधील नाराजीचा अंदाज येतो. गटबाजीमुळेच युवक काँग्रेसने एप्रिल २०२२ मध्ये सुरू केलेले ‘माझा गाव माझी शाखा’ अभियान उद्दिष्ट गाठू शकले नाही. आतापर्यंत राज्यात पाच हजारपेक्षा कमी शाखा उघडण्यात आल्याची माहिती आहे. या अभियानात प्रत्येक गावात युवक काँग्रेसचा फलक लावायचा होता. तेथे स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करायची होती व त्याची नोंद संघटनेच्या ‘ॲप’मध्ये करायची होती. या ॲपमध्ये आतापर्यंत झालेल्या या कार्यक्रमाच्या नोंदीनुसार अभियान अयशस्वी झाल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा… अजितदादा आणि चंद्रकांतदादांच्या शीतयुद्धात पुण्यातील ४०० कोटींची कामे रखडली !

आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीकरिता प्रदेश युवक काँग्रेसला “युथ जोडो-बुथ जोडो” कार्यक्रम देण्यात आला. पण, प्रदेश युवक काँग्रेसमधील गटबाजी आणि त्याचा यापूर्वीच्या कार्यक्रम अंमलबजावणीला बसलेला फटका लक्षात घेता काँग्रेसचा “युथ जोडो-बुथ जोडो” हा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राऊत यांच्या नेतृत्वात प्रभावीपणे राबवला जाईल किंवा नाही याबाबत साशंकता आहे. कारण संघटनेत राऊत त्यांच्यावर नाराज असलेले पदाधिकारी या अभियानात कितपत सहभागी होतील हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा… भाजपशी युतीनंतर अल्पसंख्याक समाजाची समजूत काढण्याचा तटकरेंचा मतदारसंघात प्रयत्न

“माझे गाव माझा शाखा यासारखाचा युथ जोडो बुथ जोडो” उपक्रम आहे. दोन्ही उपक्रम समांतर सुरू होतील. सगळे पदाधिकारी माझ्यासोबत आहे. युथ जोडो बुथ जोडा उपक्रमात जिल्हा काँग्रेस कमिटीची मदत घेण्यात येईल आणि सप्टेंबर महिनाअखेर हा उपक्रम पूर्ण करण्यात येईल. – कुणाल राऊत, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र युवक काँग्रेस.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How state congress youth president kunal raut will implement party new campaign youth jodo booth jodo a success with the help of displeased office bearers print politics news asj
Show comments