मुघल सम्राट औरंगजेब हा देशाच्या राजकारणात नेहमीच वादग्रस्त विषय राहिलेला आहे. त्यातही महाराष्ट्रात काही दिवसांपासून औरंगजेब या विषयावरून राजकारण चांगलेच तापलेले दिसले. या महिन्यात औरंगजेबाशी संबंधित अनेक वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली. काही तरुण मुलांनी औरंगजेबाचा स्टेटस सोशल मीडियावर ठेवल्यामुळे एफआयआर दाखल झाले आहेत. औरंगजेबाने सतराव्या शतकात तब्बल ४९ वर्षे भारताच्या विविध भागांवर राज्य गाजवले. त्यापैकी आताच्या महाराष्ट्रातील दख्खन काबीज करण्यासाठी औरंगजेबाने २५ वर्षे इथे घालवली. मात्र, औरंगजेबाचे स्वप्न मराठ्यांनी त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण होऊ दिले नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराज यांना पूजनीय मानले जाते. शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्षाचे लिखाण आजवर अनेक लेखकांनी करून ठेवले आहे. सामजिक क्रांतीचे प्रणेते जोतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पोवाड्यातून औरंगजेबावर आसूड ओढले आहेत. प्रखर हिंदुत्ववादी विनायक दामोदर सावरकर यांनी ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात मुघलांना मानवी वेशातील दुष्ट आत्मा, असे म्हटले आहे. औरंगजेबाला महाराष्ट्रातील राजकारणात कधीही स्थान मिळू शकले नाही. त्यातही नव्या हिंदुत्वाची मांडणी करत असताना उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून औरंगजेब हा शत्रू असल्याचे सतत बिंबवले जाते.

हे वाचा >> औरंगजेब प्रकरणावरून महाराष्ट्रात अटकसत्र; कोणत्या कलमाखाली अटक होते आणि का?

विशेषतः शिवसेनेने शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या इतिहासावरून निर्माण झालेल्या अस्मितेच्या जोरावर आपले राजकारण केले. मुंबईच्या बाहेर शिवसेनेला पहिली ओळख मिळाली असेल तर ती औरंगाबादमध्ये. औरंगजेबाच्या नावावरून या शहराचे नाव औरंगाबाद पडले. याच शहरात औरंगजेबाची समाधी आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाल आणि आक्रमक राजकारणामुळे मुस्लिम लोकसंख्या असलेल्या औरंगाबादमध्ये शिवसेनेला हिंदूंचा पाठिंबा वाढत गेला आणि औरंगाबाद महानगरपालिकेची सत्ता मिळवणे शिवसेनेला सोपे गेले. “सुमारे तीन शतकांपासून या देशाच्या मानगुटीवर औरंगजेबाचे भूत बसले होते. तीन शतकांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि मर्द मराठ्यांनी औरंगाबादच्या भूमीत पुन्हा एकदा औरंगजेबाला पुरले”, अशा ओळी बाळासाहेब ठाकरे यांनी १८८ सालच्या ‘मार्मिक’ साप्ताहिकात औरंगाबाद मनपामध्ये विजय मिळवल्यानंतर लिहिल्या.

१९९५ साली शिवसेनेने सर्वांत आधी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. औरंगाबाद महानगरपालिकेने तसा ठरावही संमत केला; मात्र कायदेशीर अडथळ्यामुळे हा ठराव अमलात येऊ शकला नाही.

२०१९ नंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसह सरकार स्थापन केले. या आघाडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या भाषेत मवाळपणा आल्याचे पाहायला मिळाले. या काळात भाजपने औरंगजेबाच्या विरोधातील आवाज उचलून धरला. महाराष्ट्रामध्ये काही दिवसांत दंगली उसळण्याचे प्रकार घडले. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे गृहमंत्रीपदही आहे, त्यांनी सांगितले की, राज्यात औरंगजेबाच्या औलादीमुळे तणाव वाढत आहे. इतर हिंदुत्ववादी संघटना जसे की, सनातन संस्था आणि संभाजी भिडे यांच्या अनुयायांनी मुस्लिमविरोधी भूमिका मांडण्यासाठी अनेकदा औरंगजेबाच्या नावाचा वापर केला आहे.

औरंगाबादचे नामांतर केल्यानंतर औरंगजेबाचे राजकारण खऱ्या अर्थाने तापायला सुरुवात झाली. मागच्या वर्षी औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी महाराज नगर झाल्यानंतर अल्पसंख्याक समाजावर ही एक प्रकारे कुरघोडी असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. एमआयएम पक्षाचे प्रमुख अकबरुद्दीन ओवेसी यांनी मे २०२२ मध्ये खुलदाबाद येथे औरंगाजेबाच्या दर्ग्याला भेट दिली. त्याच्या महिनाभरानंतर महाविकास आघाडी पडणार हे कळताच शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या नामांतराला मान्यता देण्यात आली. त्याच्याही एक महिन्यानंतर जुलै २०२२ मध्ये राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने जुन्या मंत्रिमंडळाचा आदेश रद्द करून नव्याने आदेश काढला आणि औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर असे ठेवले.

तेव्हापासून राज्याच्या राजकारणात औरंगजेबाच्या नावावरून अनेकदा सांप्रदायिक तणाव निर्माण झालेला आहे. सोशल मीडियावरही या वादाची ठिणगी पडलेली दिसते. राज्यात वाढलेल्या तणावावरून शिंदे-फडणवीस सरकारने यामागे षडयंत्र असल्याचे सांगितले. मुघल शासक औरंगजेबाची स्तुती करण्याचा प्रयत्न काही लोक जाणूनबुजून करत असल्याचा आरोप सरकारने केला.

अनेक मुस्लिम पुढाऱ्यांनी त्यानंतर सांगितले की, मुस्लिम समुदाय हा औरंगजेबाला आदर्श मानत नाही. औरंगजेब भारतीय मुस्लिमांचा शत्रू आहे. “हिंदुस्तानी मुस्लिम हे औरंजेबाचा वारसा सांगत नाहीत. मी मुस्लिम समाजाला आवाहन करतो की, त्यांनी आपल्या एकता आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करावे”, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली. पण, खासगीत बोलताना अनेक मुस्लिम नेते हेदेखील मान्य करतात की, मुस्लिम समाजाबद्दल नकरात्मक भूमिका बाळगल्यामुळे अनेक मुस्लिम युवकांना औरंगजेब जवळचा वाटत आहे.

“औरंगजेबाचा सोशल मीडियावर फोटो ठेवणारे हे बहुतेक लोक तरुण आहेत. “मला वाटते की, देशात सध्या जे काही सुरू आहे, त्याच्याशी असहमती दर्शविण्यासाठी आणि मुस्लिमांशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीचा विपर्यास केल्यामुळे त्यातून उद्विग्न झालेले तरुण असे कृत्य करत असावेत”, अशी प्रतिक्रिया एका मुस्लिम कार्यकर्त्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली.

शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबाचा पुन्हा उदो उदो होण्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले. “आम्ही महाराष्ट्राच्या मातीत ४०० वर्षांपूर्वी औरंगजेबाला गाडले. सध्या फक्त एका राजकीय पक्षाच्या फायद्यासाठीच त्याला पुन्हा बाहेर काढले जात आहे”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे एकमेव नेते असे आहेत की, ज्यांनी औरंगजेबावर टीका न करता तोही याच मातीतला असल्याचे म्हटले आहे. मागच्या आठवड्यात प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या समाधीला भेट देऊन तिथे फुले वाहिली. औरंगजेबाच्या समाधीला भेट देण्यात वावगे काय आहे? तो मुघल सम्राट होता; ज्याने या देशावर ५० वर्षे राज्य केले. आपण आता इतिहासही पुसून टाकणार आहोत का? अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी समाधीस्थळाला भेट दिल्यानंतर दिली.

मंगळवारी (ता. २० जून) आंबेडकर यांच्या समाधीस्थळी भेटीचा संदर्भ देऊन एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, आंबेडकर यांच्याप्रमाणेच जेव्हा एमआयएमच्या नेत्यांनी समाधीस्थळाला भेट दिली, तेव्हा राज्यातील राजकीय नेत्यांनी गदारोळ केला. आंबेडकर यांनी समाधीस्थळाला भेट दिल्यानंतर सांगितले जात आहे की, हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. मलादेखील हेच म्हणायचे आहे. प्रत्येकाला त्याला हव्या त्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. हेच आपल्या संविधानाचे वैशिष्ट्य आहे.

हे वाचा >> विश्लेषण: भारत आणि पाकिस्तानात अकबर आणि औरंगजेब यांच्या परस्परविरोधी प्रतिमा का आढळतात?

आंबेडकर यांनी समाधीला भेट दिल्याच्या कृतीचे समर्थन करणार का, असा प्रश्न विचारला असता, जलील म्हणाले की, होय, आम्ही याचे समर्थन करतो. त्यांना तिथे जायचे होते, ते गेले. जे समाधीला भेट देण्याचा विरोध करतात, त्यांना मी सांगू इच्छितो की, ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे. जे लोक विरोध करतात त्यांना शिवाजी महाराज हे महान का झाले? हे अजिबात माहीत नसावे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७५ वर्षांतला असा एक प्रसंग दाखवा, जेव्हा मुस्लिम समुदायाकडून औरंगजेबाची जयंती साजरी झाली आहे किंवा त्याचे फोटो लावले गेले आहेत. भाजप सत्तेत आली आणि अचानक औरंगजेब, औरंगजेब हे नाव का पुढे यायला लागले? मागच्या ७५ वर्षांत कुणाला हेही माहीत नव्हते की, औरंगजेब दिसतो कसा.

जलील यांनी भाजपावर टीका करताना सांगितले, “कर्नाटकमध्ये पराभव झाल्यानंतर भाजपाकडून सांप्रदायिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना माहीत आहे की, दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण केल्यानंतरच ते सत्तेत येऊ शकतात. काही शतकांपूर्वी जी चूक झाली आहे, त्याचा सूड तुम्ही आज नाही उगवू शकत.”

Story img Loader