संजय बापट
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितल्याच्या काँग्रसेच्या आरोपाचा समाचार घेताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगाव येथील गट अध्यक्षांच्या मेळाव्यात, “एखादी चांगली गोष्ट होणार असेल तर त्यासाठी खोटं बोललं तरी त्यात काही वाईट नाही, हीच कृष्णनीती” असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी पद्धतशीरपणे भाजप विरोधकांचा समाचारही घेताना शिंदे-फडणवीस सरकारलाही सुनावले. पण राज्य सरकारसाठी अडचणीचा ठरत असलेला सीमाप्रश्न, मुंबई व राज्यातील समस्यांकडे राज ठाकरे यांच्या भाषणात जाणीवपूर्वक किंवा अनावधनाने दुर्लक्ष झाले. कधी भाजपला पोषक भूमिका तर कधी “एकला चलो रे” चा नारा अशा गोंधळलेल्या परिस्थितीतही राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याची हमी मनसैनिकांना दिली खरी, पण पक्षातर्फे मुंबईकरांसाठी काहीही काम होत नसताना केवळ एक पाय तळ्यात आणि एक पाय मळ्यातच्या भूमिकेतून वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची ही `राज’नीती मुंबई कशी जिंकणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यावरून उठलेले वादळ, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस- भाजपमध्ये रंगलेला आरोप-प्रत्यारोपाचा सामना आणि महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावरून पेटलेल्या रणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवारच्या भाषणाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. मनसेनेही राज ठाकरे यांच्या या सभेची ‘२७ नोव्हेंबरला सबका हिसाब होगा’, ‘महाराष्ट्रातील राजकारणाने हीन पातळी गाठली अशी सर्वदूर भावना आहे, हे चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेणार..’ अशी चांगलीच जाहिरात केली होती. प्रत्यक्षात मात्र राज ठाकरे यांच्या भाषणातून ‘पुन्हा एकदा तेच ते’ यापलिकडे फारसे काही लोकांच्या हाती लागले नाही.
हेही वाचा: कबड्डीच्या मैदानातून रायगडमध्ये शिवसेना -शेकाप राजकीय तह …
आगामी काळात होऊ घातलेल्या मिनी विधानसभेच्या म्हणजेच मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह दोन डझन महापालिकांच्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे काहीतरी ठोस कार्यक्रम देतील या आशेने गोरेगावच्या नेक्सो सेंटरमध्ये हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून त्यांच्या भाषणाकडे कान-डोळे लावून बसलेल्या मनसैनिकांना आणि जनतेलाही पुन्हा एकदा केवळ दोन-चार नकलांवरच समाधान मानावे लागले. काही महिन्यांपूर्वी गुढीपाडव्याला शिवाजी पार्क येथील मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ चांगलीच धडाडली होती.
मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या ठाकरे यांच्या मागणीवरून राजकारण अक्षरश: ढवळून निघाले होते. त्यामुळे राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता पक्षाच्या शिबिरात राज ठाकरे पुन्हा कोणावर आसूड ओढतात, मनसैनिकांना काय संदेश देतात याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण खेळपट्टी अनुकूल असूनही ठाकरे यांना मात्र त्याचा फायदा उठविता आला नाही. राज ठाकरे यांचे भाषण सर्वांशी समझोत्याचे पर्याय खुले ठेवणारे होते. ठाकरे यांनी आता राज्यभर असेच मेळावे घेण्याचे संकेत दिले आहेत. पण या मेळाव्यांना केवळ नेते पाठवून काही साध्य होणार नाही. जोवर ते स्वत:ची स्पष्ट भूमिका मांडणार नाहीत आणि नेते, कार्यकर्त्यांना कामाला लावणार नाहीत तोवर त्यांना राज्यात निवडणुकीचे वातावरण कसे दिसणार?
हेही वाचा: पुणे काँग्रेसची मरगळ कधी दूर होणार ?
या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सुसंस्कृत महाराष्ट्रातील राजकरणाचा दर्जा खालावत असल्याची चिंता व्यक्त केली. देश पातळीवर राष्ट्रपुरुषांची सुरू असलेली बदनामी थांबविण्याची भाजप- काँग्रेसला तंबी दिली. “राज्यपाल आहात म्हणून मान राखतोय. शिव्यांची कमतरता नाही” असा दम राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा नि छत्रपतींचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना भरला. नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या नकला करून टाळ्याही मिळविल्या. यापलिकडे ठाकरे यांच्या भाषणातून मनसैनिक आणि जनतेच्याही हाती फारसे काही लागले नाही. गेल्या १६ वर्षांत आपल्या पक्षाने अनेक आंदोलने केली, ती यशस्वीही झाली. मात्र त्याचे श्रेय अन्य पक्षांनी हिरावून घेतले. मनसेला त्याचा लाभ मिळाला नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा: इम्तियाज जलील : ध्रुवीकरणाच्या टोकावरचा नेता
मनसेच्या आंदोलनाला जनतेचे पाठबळ मिळते पण मनसेची आणि त्यांच्या नेत्यांची कार्यपद्धती त्याचे राजकीय यशात रूपांतर करण्यात कमी पडते. साहेबांचा आदेश आला की तेवढ्यापुरते रस्त्यावर. अन्य वेळी सगळीकडे आनंदी आनंदच असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील अन्य पक्षांचे प्रमुख आणि नेते राज्य ढवळून काढत असताना, निवडणुकीची मोर्चेबांधणी करीत असताना राज ठाकरे आणि त्यांचे सवंगडी मात्र अजूनही वातावरणात निवडणूक दिसत नाही म्हणून घरात बसणार असतील तर मग मनसैनिकांनी तरी लोकांमध्ये पक्ष कसा पोहोचवायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.