भाजप-शिंदे गट आणि अजित पवार यांच्या महायुती आणि काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील इंडिया आघाडीत प्रत्येक पक्षांकडून जास्त जागांची मागणी करण्यात येत असल्याने तिढा गुंतागुंतीचा होत चालला आहे. जागावाटपात महायुती आणि इंडिया आघाडीत प्रत्येकी तीन अशा सहा पक्षांना अधिकच्या जागा हव्या आहेत. यामुळेच दोन्ही आघाड्यांना जागावाटपात तारेवरची करसत करावी लागेल.
महायुतीत भाजपच्या कलाने जागावाटप होईल, पण इंडिया आघाडीत सारेच पक्ष स्वयंभू असल्याने जागावाटपाचा प्रश्न सोडविण्याचे आव्हान असेल. इंडिया आघाडीत तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १६ जागांचे वाटप करावे, असा प्रस्ताव आला होता. पण हा प्रस्ताव काँग्रेसला मान्य नाही. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची एवढी ताकद आहे का, असा सवाल काँग्रेस नेत्यांकडून केला जातो.
महायुतीत भाजपला अधिक जागा लढवायच्या आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाने गेल्या वेळी जिंकलेल्या १८ जागांवर दावा केला आहे. सध्या शिंदे गटाचे १३ खासदार असल्याने तेवढ्या जागा तरी सोडाव्या लागतील. अजित पवार गटाने राष्ट्रवादीने गेल्या वेळी जिंकलेल्या चार जागा तसेच काँग्रेसने लढविलेल्या काही जागांवर दावा केला आहे. महायुतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागावाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची प्राथमिक बोलणी झाल्याचे समजते. फडणवीस जागावाटपाचे सूत्र तयार करून ते नवी दिल्लीत सादर करणार आहेत. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या पातळीवर शिंदे व पवार यांच्याशी चर्चा करून ते अंतिम केले जाईल, असे सांगण्यात येते.
इंडिया आघाडीत काँग्रेस विरुद्ध ठाकरे आणि पवार गट असे चित्र आहे. काँग्रेसचा २५ ते २७ जागांवर दावा आहे. २२ ते २३ जागा तरी मिळाल्या पाहिजेत, अशी राज्यातील काँग्रेस नेत्यांची रणनीती आहे. शिवसेनेने गेल्या वेळी जिंकलेल्या सर्व २३ जागांवर दावा केला आहे. शरद पवार गटाने अद्याप पत्ते खुले केलेले नसले तरी आघाडीत अधिक जागाांवर दावा असेलच. काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागावाटपात शरद पवार नेहमीच अधिक जागा पदरात पाडून घेत असत. तसेच इंडिया आघाडीत होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा – तेजस्वी यादव यांचा परदेश दौरा रद्द! बिहारमध्ये महाआघाडीत धुसफूस?
इंडिया आघाडीत पक्षांची पारंपरिक मते किती प्रमाणात मित्र पक्षाकडे वळू शकतात याबाबतही साशंकता व्यक्त केली जाते. इंडिया आघाडीत काँग्रेसचा उमेदावर रिंगणात असल्यास शिवसेनेची पारंपारिक मतदार काँग्रेसऐवजी समोर शिंदे गटाचा उमेदवार असल्यास त्याला मते देऊ शकतात. महायुतीचे जागावाटप अमित शहा यांनी दरडवल्यानंतर अंतिम होऊ शकेल. इंडिया आघाडीतील जागावाटपाचा तिढा सोडविण्याचे आव्हान असेल. राहुल गांधी यांनी कच खाऊ नये, अशी राज्यातील काँग्रेस नेत्यांची अपेक्षा आहे.