जळगाव – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून १०० बूथमागे एक मंडल अध्यक्ष, या सूत्रानुसार जिल्ह्यात ३९ मंडल अध्यक्षांच्या नियुक्तीला सध्या गती देण्यात आली आहे. त्यानंतर लवकरच जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार असल्याने, त्यापदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मंत्र्यांसह खासदार आणि आमदारांनीही आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांची त्या पदावर वर्णी लावण्यासाठी जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत.
सध्या भाजपची पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, वॉर्ड अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष, अशा स्तरांवर रचना आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर पक्षात मोठ्या प्रमाणावर नवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे पक्षाची घडी अधिक मजबूत करण्यासाठी आणि नव्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देण्यासाठी भाजपकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान तीन मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यात येत आहेत. त्यातही विशेषतः ३५ ते ४५ वयोगटातील तरुण कार्यकर्ते आणि महिलांना प्राधान्याने संधी दिली जात आहे. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यात यावेळी तब्बल २० मंडल वाढले असून, एकूण ३९ मंडलांमध्ये प्रमुखांची नियुक्ती करून प्रत्येकाला विशिष्ट जबाबदाऱ्या आगामी काळात देण्यात येणार आहेत.
संघटन पर्व अंतर्गत मंडल अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया भाजपकडून सुरू करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात भाजपचे रावेर आणि जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी पूर्व आणि पश्चिम असे दोन जिल्हाध्यक्ष कार्यरत आहेत. पैकी पूर्व भागासाठी आमदार अमोल जावळे आणि पश्चिम भागासाठी ज्ञानेश्वर पाटील जळकेकर हे सध्या काम पाहत आहेत. संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होत असताना, दोन्ही जिल्हाध्यक्षांची नव्याने निवड आता होईल. अर्थातच, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन तसेच मंत्री संजय सावकारे यांनी आपला विश्वासातील अनुभवी कार्यकर्ता त्या पदावर बसविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष आपल्या मर्जीतील असल्यानंतर पक्षावर चांगली मजबूत पकड राखता येते. त्यामुळे तिन्ही मंत्री आपापल्या स्तरावर प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे, त्या पदासाठी इच्छुक असलेल्यांनीही मोर्चेबांधणी करत जिल्ह्याची सूत्रे ताब्यात घेण्यासाठी आपला अनुभव व ताकद पणास लावली आहे. जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्षपदासाठी सध्या पी. सी. पाटील यांच्यासह कपिल पाटील, मधुकर काटे, पोपट भोळे, सुनील निकम, अमोल शिंदे, देविदास साळुंखे, व्ही. आर. पाटील, राजू सोनवणे, तसेच जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदासाठी अजय भोळे, नंदकुमार महाजन, चंद्रकांत बाविस्कर यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी कोणाची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागते, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.