मुंबई : भव्य सभामंडप, नामवंत गायक आणि संगीतकारांच्या सादरीकरणातील सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपटसृष्टी, क्रीडा व उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार, क्रीडापटू आणि उद्योगपती तसेच साधुसंतांच्या उपस्थितीत आणि अफाट जनसमुदाय, जल्लोष यात शपथविधीचा सोहळा दिमाखदार ठरला. शपथविधी सोहळ्यानिमित्त भव्य मंडपात तीन व्यासपीठे उभारण्यात आली होती. एका व्यासपीठावर साधुसंत, शपथविधीसाठी मधले व्यासपीठ तर त्या शेजारील व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Maharashtra Chief Minister Oath Ceremony : भाजपची छाप, शिवसैनिकांची पाठ लाडक्या बहिणींची उपस्थिती

शपथविधी सोहळ्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे व्यासपीठावर येताच ‘जय श्रीराम’च्या जोरदार घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांमधून झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन होताच सर्व जनसमुदायातून ‘मोदी, मोदी’ च्या घोषणा झाल्या. शपथविधी सोहळ्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी ‘देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस’ असे नाव पुकारताच उपस्थित जनसमुदायामधून ‘लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ…देवाभाऊ देवाभाऊ’…. ‘जय श्रीराम जय श्रीराम देवाभाऊ जय श्रीराम’ अशा जोरदार घोषणा झाल्या. फडणवीस हे शपथविधीसाठी उभे राहताच या घोषणा सभामंडपात घुमल्या. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव पुकरताच एकच जल्लोष झाला. ते शपथविधीला उभे राहताच शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

हेही वाचा >>> Maharashtra CM Swearing Ceremony : ‘मी पुन्हा येईन’ अखेर प्रत्यक्षात; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिमाखदार शपथविधी सोहळा

अजित पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री म्हणून पुकारताच तोच प्रतिसाद जनसमुदायातून लाभला. शपथविधीच्या सोहळ्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दिलेल्या स्पष्ट बहुमताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसमुदायाला वाकून अभिवादन केले. शपथविधी समारंभापूर्वी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या सूत्रसंचालनात प्रख्यात गायक कैलाश खेर त्याचप्रमाणे अजय-अतुल यांनी गीतांचे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे गायक सुभाष सावंत यांनी ‘देवाभाऊ’ हे गीत सादर करताच प्रेक्षकांमधून टाळ्या आणि शिट्ट्यांनी प्रचंड प्रतिसाद लाभला. त्याच वेळी ‘महाराष्ट्र मे फिरसे भगवा लेहराएंगे’ या गीतावरही कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या जोरदार घोेषणा दिल्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge crowd cheering during maharashtra cm swearing in ceremony print politics news zws