काँग्रेसचे बंडखोर नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर डेमॉक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी नावाचा त्यांचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. सध्या ते काँग्रेस पक्षावर सडकून टीका करत आहेत. “काँग्रेसशी एकनिष्ठ राहून मी अनेक वर्षे काम केले. तरीही पक्षाने माझ्याबाबत फारसे औदार्य दाखवले नाही. त्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला दिलदार मनाचे नेते वाटतात. मी सात वर्षे राज्यसभेत विरोधी पक्षाचा नेता होतो. या काळात मी पंतप्रधान मोदींच्या विरोधात अनेक भाषणे दिली. पण त्यांनी माझ्यावर राग धरला नाही, एका मुत्सद्दी नेत्याप्रमाणे ते वागले.” अशा शब्दांत पंतप्रधान मोदींचे कौतुक करत असताना आझाद म्हणाले, “पुढची काही दशके काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार नाही.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलत असताना गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. फक्त पंतप्रधान मोदीच नाही तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचेही आझाद यांनी कौतुक केले. ते म्हणाले, “अटल बिहारी वाजपेयी देशातील मोठ्या नेत्यांपैकी एक होते. मला आठवतेय संजय गांधी यांचे शेवटचे भाषण झाल्यानंतर त्यांनी त्या भाषणाची स्तुती केली होती. संजय गांधी यांनी अर्थसंकल्पावर भाषण देत असताना वाजेपयींवर जोरदार टीका केली. पण तरीही वाजपेयी यांनी संजय गांधी यांच्या टीकेला एकाही शब्दाने प्रत्युत्तर दिले नाही. ते इंदिरा गांधी यांना म्हणाले की, तुम्ही पंतप्रधान आहात ते संजय गांधी आणि तुमच्या सहकाऱ्यांमुळे. त्यामुळे मी संजय गांधींच्या विरोधात प्रतिक्रिया देणार नाही, अशी भूमिका वाजपेयी यांनी घेतली. वाजपेयी हे एक सकारात्मक दृष्टी बाळगणारे मुत्सद्दी नेते होते.”

हे वाचा >> विश्लेषण : गुलाम नबी खरेच ‘आझाद’? की भाजपशी जवळीक?

काँग्रेसने मात्र गुलाम नबी आझाद यांची टीका फार गांभीर्याने घेतलेले नाही. “आझाद आणि ज्योतिरादित्य सिंधिया या दोन्ही नेत्यांचे नेतृत्व काँग्रेसमुळे घडले, पक्षाच्या रचनेचा त्यांना खूप मोठा लाभ झाला. दिवसागणिक हे दोन्ही नेते जी काही वक्तव्ये करत आहेत, त्यावरून काँग्रेसमध्ये मिळालेल्या सन्मानाला ते लायक नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. इतक्या वर्षांपासून या दोन्ही नेत्यांच्या आत लपलेले त्यांचे खरे व्यक्तिमत्त्व आता बाहेर आलेले आहे,” अशी टीका काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी ट्विटरवर केली.

हे ही वाचा >> गुलाम नबी आझादांना झटका! पक्षाचे ३० संस्थापक सदस्य काँग्रेसमध्ये

आझाद यांची बंडखोरी

काँग्रेसचे बंडखोर नेते गुलाम नबी आझाद हे बंडखोर नेत्यांच्या जी २३ या गटातील नेत्यांपैकी एक आहेत. या २३ नेत्यांनी पत्र लिहून काँग्रेसच्या निर्णयप्रक्रियेवर जोरदार आक्षेप घेतले होते. त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन स्वतःचा पक्ष स्थापन केला. सोनिया गांधी यांना दिलेल्या पाच पानी राजीनामापत्रात त्यांनी लिहिले, “राहुल गांधी यांचे पोरकट वागणे, त्यांची राजकीय अपरिपक्वता आणि अननुभवी नेत्यांचा त्यांना असलेला गराडा यामुळे पक्ष चालू शकत नाही.” एनडीटीव्हीशी बोलत असताना आझाद यांनी सांगितले की, जी २३ च्या गटाला राहुल गांधी यांनी मोदींचे सहकारी असल्यासारखे वागवले. तसेच सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रानंतर ते म्हणाले की, हे पत्र नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I left congress because of rahul gandhi pm modi was more generous to me than congress says gulam nabi azad kvg