“तुमचे वडील आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आज जे काही आहेत तिथपर्यंत, त्यांना मीच आणलं आहे. तुमच्या जातीचे लोकही मला विचारत होते, की मी हे का करत आहे, पण तरीही मी त्यांना पाठिंबा दिला” अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज बिहार विधानसभेत शरसंधान साधले आणि त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि नितिश कुमार यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. याच वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने सर्व राजकीय नेत्यांच्या टीकेला अतिरिक्त धार प्राप्त झाली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत भाषणाला सुरूवात केली ती त्यांच्या आणि लालूप्रसाद यादव- राबडी देवींच्या सरकारमधील तुलनेने. आपल्या भाषणात लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “बिहारमध्ये आधी काय होते? तुमचे वडील आता जे काही आहेत तिथपर्यंत त्यांना मीच आणलं आहे. नितीश कुमार यांनी १९९४ ते २००५ या काळातील राष्ट्रीय जनता दलाच्या कारकि‍र्दीवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, “आम्ही २४ नोव्हेंबर २००५ला इथे आलो. त्यावेळची परिस्थिती काय होती हे मला सांगायचं आहे. संध्याकाळी कोणीही घराबाहेर पडत नव्हते. रस्ता नव्हता. मी केंद्रात मंत्री असताना आम्हाला पायी जावं लागत होतं. समाजासमाजांत संघर्षाचे वातावरण होते”.

तेजस्वी यादव काय म्हणाले?

“सरकार खटारा, सिस्टिम खटारा, मुख्यमंत्री थका हारा, आदमी घुम रहा, मारा मारा”, अशी टीका करत तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर थेट शा‍ब्दिक हल्ला चढवला. २००५ सालानंतर आपण आल्यानंतरच बिहारची परिस्थिती बदलली या नितीश कुमार यांच्या विधानाचा समाचार घेत तेजस्वी यांनी प्रश्न केला की, २००५ सालानंतरच जग निर्माण झाले का?

भाजप आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू या दोन्ही पक्षांच्या नेत्यांवरही तेजस्वी यादव यांनी टीकेची झोड उठवली. त्यातून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि संसदीय कामकाज मंत्री विजय कुमार चौधरी हेदेखील सुटले नाहीत. “तुम्ही एक बनावट भाजपा नेता आहात. तुमचे सहकारी उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा हेच खरे आहेत. तुम्ही पक्षात दाखल होऊन किती वर्षे झाली?, तुम्ही कधी नागपूरला भेट दिली आहे का?”, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. या टीकेवर तीव्र संताप व्यक्त करत प्रत्युत्तरादाखल चौधरी तेजस्वी यादव यांना म्हणाले की, “तुम्हीसुद्धा तुमच्या वडिलांप्रमाणेच त्यांच्याबाबत वाईट बोलत आहात, ज्यांच्याशी (काँग्रेस) तुम्ही पुढे जाऊन हातमिळवणी केलीत”, असे चौधरी म्हणाले.

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय जनता दल आणि जेडीयूने यांनी एकमेकांवर टीका करण्यास कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. जानेवारी २०२४ पर्यंत आरजेडी आणि काँग्रेसशी युती करणारे नितीश कुमार भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये पुन्हा सहभागी होत महाआघाडीपासून वेगळे झाले. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार सरकारला राजदने या अधिवेशनादरम्यान घेरण्याचा चांगलाच प्रयत्न केला. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार असल्याने निवडणुकांपर्यंत असेच हल्ले- प्रतिहल्ले सुरूच राहातील.

Story img Loader