नवी मुंबई – नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलो आहे. २०१९ साली ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा होता. मात्र, वरिष्ठांच्या सुचनेनुसार आम्ही बेलापूरमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा प्रचारही केला. विजयानंतर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. यंदाही तोच उमेदवार आमच्यावर लादला जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणात असेन, असा दावा भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. उद्या बंडाची भूमिका घ्यावी लागली तर तो माझा वैयक्तिक निर्णय असेल. त्याचा गणेश नाईकांशी संबंध जोडू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा सर्वस्वी निर्णय हा माझा वैयक्तिक असून ऐरोली मतदारसंघाशी याचा संबंध जोडला जाऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मला माझे वैयक्तिक मत असू शकते. गणेश नाईक हे आमचे आधारस्तंभ आहेत. परंतु बेलापूर मतदारसंघातून विद्यमान आमदाराविरोधात निवडणूक लढण्याचा संपूर्ण निर्णय हा माझा आहे, असेही संदीप नाईक यांनी स्पष्ट केले. भाजपकडून उमेदवारी मिळाली नाहीतर तुम्ही कोणत्या पक्षातून निवडणूक लढवाल, या प्रश्नावर त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. २०१९ साली आम्ही भाजप पक्षात प्रवेश केला. त्यावेळी आम्हाला नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊ असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यावेळी आम्ही पक्षश्रेष्ठींच्या मताचा आदर केला. बेलापूर मतदारसंघातील भाजपात असलेल्या बरचश्या नगरसेवकांना संघटनात्मक बांधणीसाठी दिमतीला घेतले. या काळात बेलापूरच्या आमदारांकडून आम्हाला आणि पक्ष संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला अपमानास्पद पद्धतीने वागविण्यात आले. काहींना तर शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. भाजपचा अध्यक्ष या नात्याने नवी मुंबईतील संघटन मजबूत कसे राहील, यासाठी काम करीत राहिलो. या संपूर्ण काळात बेलापूरच्या नेतृत्वाकडून आम्हाला असहकार केला जात होता. यामुळे यंदाच्या निवडणुकीत बेलापूरची जागा आम्हाला मिळावी, यासाठी पक्ष नेतृत्वाकडे आग्रह धरला आहे. परंतु कार्यकर्त्यांच्या भावनेचा अपमान होत असेल तर, संघर्ष केल्याशिवाय माझ्यापुढे पर्याय नाही, असेही नाईक यांनी सांगितले. हा संपूर्णपणे माझा वैयक्तिक निर्णय असून ऐरोली विधानसभा क्षेत्राशी हा निर्णय जोडला जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – महाराष्ट्रातील १५० मतदारसंघात ‘भारत जोडो’ अभियान, विदर्भातील ४० मतदारसंघांचा समावेश

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध शिवसेना

गणेश नाईकांना मंत्रिपद मिळायला हवे होते, गणेश नाईक हे राज्याचे मोठे नेते आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांनी दहा वर्षे भूषविले आहे. लोक भावनेचा आदर करून त्यांना महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रिपद मिळायला हवे होते, अशी अपेक्षा संदीप नाईक यांनी बोलून दाखविली. संपूर्ण नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मनात या विषयी खंत आहे. ठाणे लोकसभेची जागा आम्हाला मिळाली नव्हती. त्यावेळी कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. कार्यकर्त्यांच्या भावनेचा त्यामुळे आम्हाला विचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.