कोल्हापूर : बेरजेच्या राजकारणावर भर देऊ लागलेल्या भाजपचे इचलकरंजीतील निष्ठावंत आणि नवागत यांचे मनोमिलन नाट्य चांगलेच रंगतदार बनले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपात प्रवेश केलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या मनोमिलन घडवण्याचा पहिला अंक कसाबसा पार पडला. हे नाट्य रंगवण्याचा प्रयत्न असताना त्याचे उप कथानक पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांच्या बंडखोरीमुळे वेगळ्याच दिशेला जाऊ लागले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे स्थान उंचावण्याचा इरादा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात बोलून दाखवला असला तरी संकल्प आणि पूर्तता यातील अंतर भाजपला मोठ्या प्रयत्नाने पार करावे लागणार आहे. भाजपकडे गेलेला काँग्रेस – राष्ट्रवादीचा प्रवाह पुन्हा महाविकास आघाडीकडे वळू लागला आहे. अशावेळी बेरजेचे राजकारण करीत भाजपने आमदार प्रकाश आवाडे – राहुल आवाडे या पिता पत्रांना पाच वर्षानंतर प्रवेश दिला असला तरी इचलकरंजीतील कार्यालय अद्यापही त्यांना उघडले गेले नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश हाळवणकर यांच्या निष्ठेचा गौरव करीत विधान परिषदेत संधी देण्याचे आश्वासन दिले. अर्थात अशा प्रकारचे आश्वासन हाळवणकर यांना अपेक्षित असावे. त्यांनी आपल्या निष्ठा कायम राहतील असे म्हणतानाच पक्षाने उमेदवारी जाहीर केली नसताना प्रकाश आवाडे ज्या पद्धतीने राहुल आवाडे यांचे नेतृत्व पुढे आणण्याच्या प्रकारावर टीकास्त्र डागून संतापला वाट मोकळी केली आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरे यांना शेकापची साथ नकोशी ?
राजकारणात कथणी आणि करणी यात फरक असल्याचे म्हटले जाते. हाळवणकर यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पुढे आली आहे. दुसरीकडे भाजपमधील एक वर्ग आवाडे यांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण करीत पुढे जाण्याचे समर्थन करताना दिसत असल्याने पक्षातील दोन भूमिका ठळकपणे पुढे आल्या आहेत. बावनकुळे यांच्या इचलकरंजीतील दौऱ्यानंतर वरकरणी आवाडे – हाळवणकर यांच्यात मनोमिलन होत असल्याचा संदेशनाट्य पेरले गेले असताना त्यातील उपकथनात धक्कादायक वळणावर आले आहे. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी आवाडे यांच्या आयात उमेदवारीला विरोध करीत अपक्ष लढण्याची घोषणा केल्याने भाजपातील जिल्ह्यातील बंडाचा पहिला झेंडा फडकला आहे. गेली दोन दशके हाळवणकर – शेळके यांच्यात घनिष्ठ संबंध आहेत. शेळके यांनी घेतलेली भूमिका ही स्वतंत्र बाण्याची म्हणणे धाडसाचे ठरेल. किंबहुना शेळके यांच्या उपकथानकाचे नेपथ्य जाणत्यांना अपरिचित नसावे. हाळवणकर यांच्या सहकार्यामुळेच शेळके यांना जिल्हाध्यक्ष, यंत्रमाग महामंडळ मिळाले आहे. अशा शेळके यांच्या भूमिकेचे काय करायचे यावर भाजप-श्रेष्ठींना निर्णय घ्यावा लागणार आहे. शिवाय, हाळवणकर अनिच्छेने आयात उमेदवाराचा प्रचार करणार, विधान परिषदेची प्रतीक्षा करणार कि अंतर्गत राजकारणात शेळके वा अन्य कोणाला मदत करणार हेही निर्णायक ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्धार कयम ठेवला आहे. याही बाबतीत महायुतीचे नेते कोणती भूमिका घेतात हेही नाराजी नाट्याच्या मंचावर महत्त्वाचे ठरणार आहे.