नागपूर: अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूर विधानसभेत यंदा तब्बल ६ टक्क्यांनी म्हणजे ६४ हजार ६१८ मतांनी वाढ झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेल्या दलित आणि मुस्लीम समाजाची संख्या मोठी आहे. या मतांचे विभाजन झाल्यास भाजपला फायदा होतो. मात्र, लोकसभेप्रमाणे हा मतदार यंदाही काँग्रेसकडे गेल्यास भाजपला फटका बसू शकतो.
उत्तर नागपूर मतदारसंघात २०१९ मध्ये काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत हे २० हजार मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी ३ लाख ७५ हजार मतदानापैकी १ लाख ९३ हजार म्हणजे ५२ टक्के मतदान झाले होते. यावर्षी मतदारांचीही संख्या वाढली आहे. उत्तर नागपूरमध्ये एकूण मतदार ४ लाख २८ हजार असून यात पुरुष मतदार हे २ लाख १२ हजार तर महिलांची संख्या २ लाख १५ हजार इतकी आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. यावेळी उत्तर नागपूरमध्ये एकूण मतदान २ लाख ४८ इतके झाले. यात त्रुरूष १ लाख २५ हजार तर महिला मतदार १ लाख २३ हजार इतक्या आहेत. मतदानाची टक्केवारी ५८.५ टक्के इतकी आहे.
हेही वाचा – दक्षिण नागपूरमधील महिलांची वाढलेली मते निर्णायक
यंदा मतदानाच्या टक्केवारीमध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली. वाढलेला मतदान टक्का हा कायम सत्तापरिवर्तनाच्या दिशेने असतो असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. तर लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला असाही काहींचा अंदाज आहे. परंतु, उत्तर नागपूरमध्ये २०१९ आणि २०२४ मधील महिला मतदारांची टक्केवारी बघता यंदा महिलांनी अधिक मतदान केल्याचे दिसत नाही. त्यामुळे वाढलेले मतदान कुणाला फायद्याचे ठरणार याची उत्सुकता आहे.
हेही वाचा – पूर्व नागपूरचा निकाल बंडखोरच ठरवणार
अडीच लाख बौद्ध मतदार
उत्तर नागपूरमध्ये २ लाख ५० हजार बौद्ध मतदार असून मुस्लीम आणि पंजाबी मतदारही मोठ्या संख्येने आहेत. हे काँग्रेसचे परंपरागत मतदार असल्याने भाजपकडून कायम बौद्ध आणि मुस्लीम मतांच्या विभाजनाचा प्रयत्न होतो. यावेळीही भाजपने तो प्रयोग केला. मात्र, लोकसभेत दलित मतांचे विभाजन करणे भाजपला शक्य झाले नाही. त्यामुळे लोकसभेत या मतदारसंघातून भाजपला सर्वात कमी मतदान झाले. तर काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली होती. असे असले तरी बौद्ध व मुस्लीम मतांच्या विभाजनावर येथील निकाल अवलंबून राहणार आहे.