Veteran Congress leader Mani Shankar Aiyar: काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे अनेकदा वादग्रस्त राहिले आहेत. स्वा. सावरकर यांच्यावर केलेल्या विधानामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. अय्यर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी काँग्रेसमधील त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास, तसेच गांधी परिवारामुळे त्यांची कारकिर्द कशी घडली आणि बिघडली, याबाबत भाष्य केले आहे. तसेच सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्याशी त्यांचा फारसा संबंध आला नाही, असेही ते म्हणाले. केवळ एकदाच त्यांचे राहुल गांधींशी बोलणे झाले होते. तर प्रियांका गांधींबरोबर दोन वेळा संवाद साधण्याची संधी मिळाली, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१२ साली प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करायला हवे होते

मणिशंकर अय्यर यांनी २०१२ साली काँग्रेसवर कोसळलेल्या दोन संकटाबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, २०१२ साली तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आजारी होत्या तर तत्कालीन पंतप्रधान मनमोह सिंग यांच्या सहा बायपास सर्जरी झाल्या होत्या. त्यामुळे सरकार आणि काँग्रेस पक्ष दोन्ही पंगू झाले होते. पक्षाने त्यावेळी प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान बनवले असते आणि नंतर राष्ट्रपती केले असते तरी चालले असते. असे झाले असते तर २०१४ साली काँग्रेसचा इतका वाईट पराभव झाला नसता.

हे वाचा >> माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, AIIMS रुग्णालयात दाखल

जर डॉ. मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती आणि प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान केले गेले असते तर काँग्रेसवर २०१४ साली अवमानकारक पराभवाची परिस्थिती ओढवली नसती. काँग्रेसला त्या निवडणुकीत केवळ ४४ जागा जिंकता आल्या होत्या.

मी ख्रिश्चन नाही, असे सोनिया गांधी म्हणाल्या होत्या

अय्यर यांनी सोनिया गांधींशी निगडित एक किस्सा सांगितला. “एकदा मी सोनिया गांधींना नाताळच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण त्या म्हणाल्या की, मी ख्रिश्चन नाही. साहजिकच मी माझे शब्द मागे घेतले. सोनिया गांधी यांना स्वतःला ख्रिश्चन म्हणवून घेणे आवडत नव्हते, हे मला कळले”, असे मणिशंकर अय्यर या मुलाखतीमध्ये म्हणाले.

मणिशंकर अय्यर हे माजी राजनैतिक अधिकारी आहेत. त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयात सेवा दिली होती. त्यांनी तमिळनाडूमधील लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते. तसेच राज्यसभेचेही सदस्यपद त्यांनी भूषविले होते.

राहुल गांधींशी संवाद झालाच नाही

मणिशंकर अय्यर म्हणाले, दशकभरात सोनिया गांधींशी समोरा-समोर चर्चा करण्याची मला एकही संधी मिळालेली नाही. राहुल गांधींबरोबर एक प्रसंग वगळता त्यांच्याशी विस्तृत चर्चा करण्याची संधी मिळालेली नाही. तर प्रियांका गांधींबरोबर दोन प्रसंगावेळी संवाद साधता आला. माझ्या आयुष्यातील अडचण अशी आहे की, माझी राजकीय कारकीर्द गांधी कुटुंबाने घडवली आणि घडवली नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

अय्यर पुढे म्हणाले की, त्यांना एकदा राहुल गांधी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. मात्र त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, तेव्हा त्यांनी प्रियांका गांधीमार्फत शुभेच्छा पाठविल्या. प्रियांका गांधी तेव्हा राजकारणात सक्रिय नव्हत्या. “मी त्यांना (प्रियांका गांधी) काही वेळा भेटलो, माझ्याशी त्या नेहमीच चांगल्या वागल्या. त्याचवेळी मी त्यांना राहुल गांधींना शुभेच्छा देण्यास सांगितले”, असेही ते म्हणाले. मात्र माझ्या विनंतीनंतर प्रियांका गांधी चकीत झाल्या. तुम्ही थेट त्यांनाच का शुभेच्छा देत नाही? असे त्यांनी मला विचारले. त्यावर मी म्हणालो, मी पक्षातून बडतर्फ झालेलो आहे. त्यामुळे मी माझ्या नेत्याशी बोलू शकत नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If pranab mukherjee became pm mani shankar aiyar cites congress disasters and 2014 fall out kvg