राज्यातील प्रदेश काँग्रेसच्या तीसहून अधिक ज्येष्ठ नेत्यांना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींसमोर गाऱ्हाणे मांडण्याची संधी मिळाली असल्याने दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयातील बैठक पाच तास सुरू होती. बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लक्ष्य ठरले खरे पण, खरगेंनी शिताफीने परिस्थिती हाताळली आणि झाले ते पुरे झाले, एकजुटीने कामाला लागा, असा इशारा दिला. राजस्थान काँग्रेसमधील नेत्यांना वठणीवर आणले तर महाराष्ट्रातील नेत्यांची समजूत घालणे त्यांच्यासाठी फार अवघड गेले नसावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाने दिल्लीत प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलावल्यामुळे राज्यातील परिस्थितीवर चर्चा होणे अपेक्षित होते. पण, त्यानिमित्ताने पक्षांतर्गत खदखदही नेत्यांना मांडता आली, नेत्यांनी एकमेकांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी पक्षातील एक गट सातत्याने करत आहे. त्यांच्यापैकी सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आदी विदर्भातील नेत्यांनी नाना पटोले निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेत नाहीत, त्यांचा मनमानी कारभार योग्य नाही, अशी तक्रार केली.

हेही वाचा – जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला सांगलीतूनच आव्हान

या नेत्यांनी राहुल गांधींसमोर पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल पुनर्विचार करण्याची अप्रत्यक्ष मागणी केल्यामुळे पटोले बैठकीत संतापले. त्यांनी या नेत्यांवर पलटवार केला. ‘काहींना मी प्रदेशाध्यक्ष नको असल्याने ते सातत्याने दिल्लीत येऊन माझ्याविरोधात तक्रारी करतात आणि राज्यात येऊन प्रसारमाध्यमांशी बोलतात. त्यांच्या या वागण्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये एकजूट नसल्याचे चुकीचे चित्र निर्माण होत आहे. हा प्रकार थांबला पाहिजे’, असे पटोले म्हणाले. हा वाद वाढू लागल्याने अखेर खरगेंनी मध्यस्थी केली. ‘पटोले तुम्ही कुणाच्याही मतदारसंघात संबंधित नेत्याला न सांगता जाऊ नका, त्या नेत्याला सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करा’, अशी समज खरगेंनी पटोलेंना दिली. वडेट्टीवार यांच्यासंदर्भात केंद्रीय नेत्यांपर्यंत तक्रारी गेल्यामुळे त्यांच्यावरही खरगेंनी नाराजी व्यक्त केली. ‘पक्षाची शिस्त कोणीही मोडू नका’, असे सांगत खरगेंनी वडेट्टीवार यांना चपराक दिल्याचे समजते. ‘एकमेकांविरोधातील मतभेद मिटवा, कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही एकजुटीने लोकसभेची निवडणूक लढावी लागणार आहे’, असा गर्भित इशारा राहुल गांधींनी दिल्याचे सांगितले जाते.

नेते स्वतःपुरते बघतात!

काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते फक्त स्वतःच्या मतदारसंघापुरते बघतात, त्यांनी पूर्ण राज्याचा विचार केला पाहिजे. या नेत्यांकडे पैशांचीही वानवा नाही, त्यांनी ठरवले तर ते एक-एक मतदारसंघ मजबूत करू शकतात, असा नाराजीचा सूरही बैठकीत मांडला गेला. प्रभारीपदाची जबाबदारी खरगेंचे विश्वासू एच. के. पाटील यांच्याकडे असली तरी ते आता कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री झाल्याने महाराष्ट्रासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करून नव्या प्रभारीची नियुक्त करावी, अशी मागणी नाना पटोलेंनी पाटील यांच्यासमोर उघडपणे केली. पाटील आणि पटोलेंचे मतभेद तीव्र झाल्याचे दिसले. आता कदाचित महाराष्ट्रात नवा प्रभारी नेमला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय भाजपसाठी धोक्याचा इशारा

विस्ताराचे सादरीकरण…

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यात काँग्रेसच्या संभाव्य विस्ताराची चाचपणी केली गेली. त्यासंदर्भात अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी सविस्तर सादरीकरण केले. मतदारसंघनिहाय काँग्रेसच्या ताकदीचा आढावा घेण्यात आला. लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे न लढवता महाविकास आघाडीत सक्रिय राहून लढवली पाहिजे, असा आग्रही मुद्दा बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला.

प्रकाश आंबेडकरांचे काय करायचे?

‘वंचित बहुजन महासंघा’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाशी हातमिळवणी केली असली तरी, त्यांना सोबत घ्यायचे की नाही याबाबत पक्षांत एकमत नाही. आंबेडकरांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा बैठकीत मांडला गेल्याचे समजते. त्यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’च्या संभाव्य युतीच्या शक्यतेवरही चर्चा करण्यात आली. भाजपला पराभूत करण्याचे उद्दिष्ट असल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन महासंघा’लाही सोबत घेतले पाहिजे, असेही मत नेत्यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If the leaders of rajasthan congress are brought on right track so it should not have been very difficult for them for leaders of maharashtra print politics news ssb