कोल्हापूर : मनसे नेते राज ठाकरे यांनी राज्यात विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली असताना कोल्हापुरात इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. जिल्ह्यात दहा मतदारसंघांत निवडणूक लढवण्याची तयारी मनसेने सुरू केली असली तरी सक्षम उमेदवाराचा शोध घेण्यातच पक्षाची खरी कसोटी लागणार आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांना पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण, खंडणीप्रकरणी अटक झाल्याने पक्षाची प्रतिमा डागाळली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे शिवसेना चांगलीच स्थिरावली आहे. दहा वर्षापूर्वी सहा आमदार आणि २०१९ मध्ये दोन्ही खासदार निवडून आणण्या इतपत सेनेची ताकद वाढली. बाळासाहेबांप्रमाणेच राज ठाकरे यांनी सुद्धा या जिल्ह्यात मनसेचे रेल्वे इंजिन वेगाने धावावे यासाठी या भागात बरेच दौरे केले आहेत. गेल्या दौऱ्या वेळी त्यांनी इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अशा वेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या गाठीभेटी घेऊन पक्षाचा परिघ रुंदावण्याचा प्रयत्न केला होता.
आणखी वाचा-नांदेड जिल्ह्यात काँग्रेस इच्छुकांची संख्या वाढली
तथापि, जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी असा काही प्रयत्न करावा, त्यायोगे पक्षाची वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. किंबहुना उंचीच्या नेतृत्वाचा अभाव , गरजेपुरते काम पाहणारे संपर्क प्रमुख यामुळे येथे राज ठाकरे यांच्या मनासारखा पक्ष कधीच रुजला नाही. तीच ती आंदोलने करून प्रकाशझोतात राहणे इतकाच पदाधिकाऱ्यांचा मर्यादित हेतू नेहमीच राहिला आहे. अशा आंदोलनातून लोकप्रिय होऊ असा त्यांचा कयास असला तरी जनमताचा त्यांना पाठिंबा मिळताना दिसत नाही.
कोल्हापूर सारख्या शहरात एखादा नगरसेवक, अन्य नगरपालिकांमध्ये शून्यवत स्थिती, कुठेतरी एखादा ग्रामपंचायत सदस्य इतकेच माफक यश या पक्षाला इतक्या वर्षाच्या संघर्षानंतर मिळालेले आहे. त्याला कारण स्थानिक खुजे पक्ष नेतृत्व, त्यांचा संकुचित दृष्टिकोन, पक्षांतर्गत मतभेद यास कारणीभूत ठरले आहेत. आहे. मुख्य म्हणजे मनसैनिक हाच मुळी नेमका कोणाचा झेंडा हाती घ्यायचा याच संभ्रमात अडकलेला आहे. एखाद्या निवडणुकीत त्याला आघाडीचा जयजयकार करावा लागतो. तर दुसऱ्याच निवडणुकीत आधीची भूमिका पूर्णतः बदलून भिन्न विचारसरणी असलेल्या महायुतीच्या विजयाच्या घोषणा देत फिरावे लागते. त्यामुळे पक्षाचा स्वतःचा विचार नेमका कोणता या शोधातच कार्यकर्ता गुरफटला आहे. बरोबरीचे कार्यकर्ते अन्य पक्षात जाऊन पुढच्या कुठे गेले तरी मनसैनिक अजूनही कार्यकर्ता म्हणूनच वावरत असल्याचे चित्र आहे. त्यात पक्ष नेतृत्वाकडून पुरेसे पाठबळ मिळत नसल्याने कार्यकर्तेही तोंडदेखले काम करताना दिसतात.
आता विधानसभा निवडणुकीसाठी मनसेतील अनेकांनी कंबर कसली आहे. मतदारसंघनिहाय बैठकांचे पेव फुटले आहे. १० मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. निवडून येण्याच्या क्षमतेच्या ( इलेक्टिव्ह मेरिट) उमेदवारांचा शोध हे खरे पक्षासमोर कडवे आव्हान आहे. केवळ निवडणूक लढवायची म्हणून लढवायची अशा उद्देशाने पक्ष याकडे पाहणार असेल तर त्यातून फारसे काही साध्य होईल असे दिसत नाही. पक्षाकडे असलेले पदाधिकारी आणि इच्छुकांची नावे पाहता यापैकी एकाने तरी अनामत राखली तरी गड जिंकला असे म्हणण्यासारखी पक्षाची केविलवाणी स्थिती जिल्ह्यामध्ये आहे. मनसेतील जिल्हा नेतृत्व डागाळलेले आहे. यापूर्वी एका जिल्हाध्यक्षांवर हद्दपार होण्याची वेळ आली होती . तर आता कोल्हापुरातील एका पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापकांना बेदम मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, खंडणी सारख्या गुन्हामध्ये जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक झाली आहे. परिणामी, निवडणुकीला सामोरे जात असताना अशा घटनामुळे मनसेच्या प्रतिमेला आणखी ओहोटी लागली आहे.
© The Indian Express (P) Ltd