उत्तरप्रदेशच्या राजकारणात बहुजन समाज पार्टीचा ( बसपा ) जनाधार मागील काही दिवसांमध्ये घटलेला आहे. याच कारणामुळे बसपा हा पक्ष २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत कमाल दाखवू शकला नाही. मात्र बसपाच्या सर्वेसर्वा मायावती या पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय झाल्या असून त्यांनी २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मुस्लीम मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी इम्रान मसूद यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सपा पक्षातून बसपामध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे मसूद यांनी पक्षात प्रवेश करताच मायावती यांनी त्यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेशचे संयोजक म्हणून नेमणूक केली आहे. सोबतच त्यांच्यावर उत्तराखंडचीही जबाबदारी सोपवली आहे.

हेही वाचा >>> ‘भारत जोडो यात्रे’चा कर्नाटकात सकारात्मक परिणाम, दिग्गज नेत्यांचं मनोमिलन; काँग्रेस कात टाकणार?

इम्रान मसूद हे बहुजन समाज पार्टीचे मुस्लीम चेहरा ठरण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने बसपाकडून रणनीती आखण्यात येत आहे. पक्षात प्रवेश करताच मसूद यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना येथील मुस्लीम मतदारांशी संवाद साधण्याची तसेच सभा बैठकांच्या माध्यमातून या मतदारांना पक्षापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मायावती यांनी पश्चिम उत्तर प्रदेशच्या विभागीय समन्वयकांना मसूद यांच्या काही बैठका, सभा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. मसूद यांच्याकडे मुरादाबाद, सहारनपूर, बरेली, मेरठ या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच या भागात होण्याऱ्या सर्व बैठकांमध्ये मसूद हे सर्वात शेवटी बोलतील. तसेच त्यांना बोलण्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा, असे निर्देशही मायावती यांनी येथील स्थानिक नेत्यांना दिले आहेत.

हेही वाचा >>> विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये बंडखोरी! अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवल्यास कारवाईचा इशारा

पश्चिम उत्तर प्रदेशसह मायावती यांनी मसूद यांच्यावर उत्तराखंडचीही जबाबदारी सोपवली आहे. मसूद यांना उत्तराखंडमधील डेहराडून, हरीद्वार, उधम सिंह नगर, नैनीताल या भागावर लक्ष्य केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. या भागात मुस्लीम लोकसंख्या जास्त असल्यामुळे मसूद यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते बसपा पक्षातील मुस्लीम चेहरा ठरण्याची शक्यता आहे. तशी चर्चा बसापाच्या नेत्यांमध्ये सुरू आहे.