छत्रपती संभाजीनगर : नांदेड लोकसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छूक असल्याची वावडी उठवून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद (पूर्व )मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. या मतदारसंघातून भाजपचे नेते व मंत्री अतुल सावे २०१९ मध्ये विजयी झाले होते. या वेळी या मतदारसंघात कॉग्रेसनेही निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद (पूर्व ) मतदारसंघाची लढत तिरंगी होईल. या मतदारसंघात नव्या मतदारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया एमआयएमकडून लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून सुरू होती.

मजलीस – ए- इत्तिहादुल मुसलमीन या पक्षाच्या वतीने औरंगाबाद पूर्व मतदारसंघात दोन वेळा निवडणूक लढवणारे डॉ. गफ्फार कादरी यांचा दोन वेळा पराभव झाला होता. मतदारसंघाातील मतदानाची मानसिकता ‘ हिंदू- मुस्लिम’ विभाजनाची असल्याचे राजकीय गणित नेहमी मांडले जाते. या वेळी या मानसिकतेमध्ये ‘ मराठा – ओबीसी’ असेही विभाजन असेल, असे सांगण्यात येत आहे. २०१४ मध्ये इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद मध्य मधून निवडणूक लढविली होती. त्यांना ६१ हजार ८४३ मते मिळवून ते विजयी झाले होते. तेव्हा शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांना ४१ हजार ८६१ आणि भाजपच्या किशनचंद तनवाणी यांना ४०७७० मते मिळाली होती.

हेही वाचा >>>आमगावात विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; अर्जुनी मोरगावमध्ये माजी आमदाराला संधी

हिंदू मतविभाजनाचा लाभ ‘ एमआयएम’ ला मिळाल्याची भावना तेव्हा निर्माण झाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील निवडून आले. २०२४ मध्ये लोकसभा निवडणकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाच तर विधानसभा निवडणूक लढवू असा त्यांचा होरा होता. आता ते विधानसभा निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. खासदार म्हणून जलील यांनी आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आणले. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे अनेक प्रश्नावर राज्य सरकारला भूमिका घ्यावी लागली. ते स्वत: न्यायालयात युक्तीवाद करत. त्यामुळे चांगले काम करणाऱ्यास लोक विसरणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर व्यक्त केली.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात २०१४ मध्ये ३० उमेदवार रिंगणात होते. २०१९ मध्ये ३४ उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेकडून स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविण्यात आला होता. गेल्या वेळी म्हणजे २०१९ मध्येकॉग्रेसने ही जागा समाजवादी कॉग्रेस पक्षास सोडली होती. त्यामुळे औरंगाबाद शहरातून ‘ पंजा ’ हे चिन्हच गायब झाले होते. या वेळी तसे होऊ नये याची काळजी कॉग्रेस नेत्यांनी घेतली आहे.