लातूर: लातूर विधानसभा निवडणुकीत १९९५ साली विलासराव देशमुखांना ‘मामुली’मुळे पराभव पत्करावा लागला. यातील ‘मा’ म्हणजे मारवाडी, ‘मु’ म्हणजे मुस्लिम आणि ‘लि’ म्हणजे लिंगायत अशी फोड तेव्हा करण्यात आली होती. काँग्रेसला या मतपेढीचा तेव्हा फटका बसला होता. पण लोकसभा निवडणुकीमध्ये तेच प्रारुप पुन्हा काँग्रेसच्या बाजूने झुकताना दिसू लागले आहे.
तेव्हा भाषणात विलासराव देशमुख यांनी विरोधक काय ‘मामुली’ आहेत असा उल्लेख केला होता. त्याला तीन जातीच्या मतपेढीत पद्धतशीरपणे विभागले गेले आणि जनता दलाचे शिवाजीराव पाटील कव्हेकर निवडून आले होते. या वेळच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने लिंगायत समाजातील ‘माला जंगम’ पोट जातीतील डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिल्यामुळे लिंगायत समाज हा काँग्रेसच्या सोबत आहे .मुस्लिम समाज हा तर भाजपच्या विरोधात मतदान करेल, हे भाजपनेही गृहीत धरले आहे. लातूर हा आरक्षित मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघातून मातंग समाजाला उमेदवार द्यावी अशी मागणी होती. ती पूर्ण झाली नाही त्यामुळे मातंग काँग्रेसबरोबर उभे ठाकतील असे सांगण्यात येत आहे. मराठा समाज आरक्षण प्रश्नावरुन मराठा समाजही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्यामुळे या वेळी ‘मामुली’ची परतफेड होईल, असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : रायबरेलीतूनही लढणे ही वायनाडची फसवणूक; डाव्या पक्षांकडून राहुल गांधींवर टीका
भाजपने ही चर्चा चालू असतानाच लिंगायत समाज हा पारंपारिक आपला मतदार आहे त्यामुळे लिंगायत समाजाला काँग्रेसने गृहीत धरू नये, अनुसूचित जाती जमातीमधील जातीचे उल्लेख करणे चुकीचे असल्याचाही दावा केला जात आहे. याशिवायमोदी प्रभावही बरोबर असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.
हेही वाचा : १९८१ मध्ये राजीव गांधींनी अमेठीत मिळविला होता विक्रमी विजय; जाणून घ्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा इतिहास
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना लातूर नगर परिषदेची निवडणूक लागली होती त्यावेळी लोकातून नगराध्यक्ष निवडायचा होता .काँग्रेस पक्षातर्फे हरिभाऊ हिरास तर राष्ट्रवादी च्या पाठिंब्यावर जनार्धन वाघमारे निवडणुकीच्या रिंगणात होते. काँग्रेस पक्षाच्या वतीने बुद्धिवंताचे राजकारणात काय काम आहे , असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता तेव्हा बुद्धिमंत्ताचेच राजकारणात काम आहे असे समर्थन जनार्धन वाघमारे यांच्यामार्फत करण्यात आले होते .ते कुलगुरू म्हणून निवृत्त झाले होते .त्यानंतर राज्यात ‘सीएम’ लातूरात ‘जे एम’ असा प्रचार सुरू होता. तेव्हा जे एम वाघमारे निवडून आले होते. प्रचारातील संक्षिप्त रुपे वापरणाऱ्या लातूर लाेकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा ‘ मामुली’ अवतरले असून त्यात थोडासा बदल करुन त्याचा प्रचार काँग्रेसच्या बाजूने केले जात आहे.