काँग्रेसमधील संघाचे छुप्या पाठिराख्यांना पक्षातून काढून टाकण्याची आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अहमदाबादमधील सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय स्मारकातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे.
काँग्रेसच्या दोन दिवसांच्याअधिवेशनाला मंगळवारी सुरुवात झाली असून गुजरातमध्ये ६४ वर्षांनी पक्षाचे अधिवेशन भरवले जात आहे. या अधिवेशनातून गांधी आणि पटेल यांचा वारसा काँग्रेसने सोडलेला नाही हा ठोस संदेश दिला जात आहे.
मोदींची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसने सरदार पटेलांच्या स्मारकांमध्ये काँग्रेसचा जथ्था जमा झालेला आहे. याच सरदार पटेल स्मारकातून काँग्रेसला नवी दिशा देण्याचा प्रयत्न होत आहे. हे अधिवेशन म्हणजे काँग्रेससाठी मोठे वळण असेल असा दावा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पत्रकारांना सांगितले.
सरदार पटेल हे काँग्रेसचे दिग्गज नेता होते पण, काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला असे सांगत भाजपने पटेल आमचेच असे म्हणायला सुरुवात केली. पण, या अधिवेशनातून सरदार पटेलांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणले जात आहे. सरदार पटेल स्मारकाच्या बाहेर लावलेल्या मोठ्या फलकांमध्ये ठळकपणे सरदार पटेल पाहायला मिळतात. इथे अन्य दिग्गज काँग्रेस नेत्यांनी छायाचित्रे नाहीत फक्त सरदार पटेलच दिसतील!
महात्मा गांधीचे विचार हेच काँग्रेसचे राजकारण असल्याचा मुद्दाही ठसवला जात आहे. सरदार पटेल स्मारकापासून जवळच असलेल्या साबरमती आश्रमामध्ये म्हणजेच गांधीजींच्या आश्रमामध्ये काँग्रेसने प्रार्थनासभा आयोजित केली आहे. अहमदाबादमध्ये अधिवेशन तेहीसरदार पटेल समारकामध्ये, गांधी आश्रमामध्ये काँग्रेस नेत्यांची उपस्थिती या बाबी प्रतिकात्मक असल्या तरी त्यातून भाजपविरोधात उभे राहण्याचा आक्रमक संदेश कार्यकर्त्यांना दिला गेला आहे.
© The Indian Express (P) Ltd